
जाळून टाकू, मारून टाकू, लटकवून टाकू अशा धमक्या आम्हाला दिल्या जात असल्याची गंभीर तक्रार एनसीबीचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांची पत्नी, अभिनेत्री क्रांती रेडकर हिने केली आहे. आम्हाला संरक्षण दिल्याबद्दल आम्ही सरकारचे आभारी आहोत, असेही क्रांतीने म्हटले आहे.
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर क्रांती रेडकर पहिल्यांदाच मीडियासमोर आली आणि तीने बाजू मांडली. सोशल मीडियावर काही बनावट अकाऊंटवरून आम्हाला धमक्या येत असल्याचे तिने सांगितले. क्रांती म्हणाली, समीर प्रामाणिक अधिकारी असल्यामुळे त्यांच्या प्रामाणिकपणाचा अनेकांना त्रास होतोय. त्यामुळेच त्यांना लक्ष्य केले जात आहे. समीर यांनी जातीचे कोणतेही बनावट प्रमाणपत्र केलेले नाही. जर त्यांनी असे केल्याचे पुरावे असतील तर न्यायालयात सादर करावेत.’
क्रांतीने पुढे म्हटलेय, समीर यांच्यावरील आरोपांमुळे नक्कीच त्रास होतोय. ते आम्ही सहन करणार नाही. ज्यांनी आमच्याविरोधात आरोप केले त्यांनी कोर्टात जावे. मला मराठी असल्याचा अभिमान आहे. मला माझ्याच महाराष्ट्रात कोणीतरी धमकावतं. आम्हाला लोकांचा पाठिंबा मिळतोय, पण समीर वानखेडेविरोधी लोक आम्हाला प्रचंड त्रास देतायत, धमक्या देतायत, असा आरोपसुद्धा क्रांतीने केला आहे.
































































