
शनिवारी सकाळी 10 वाजता एक लाल शर्ट घातलेली व्यक्ती दादर रेल्वे स्थानकात येणार असून तो मुंबईत कुटाणा करणार आहे, असा मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला निनावी कॉल शुक्रवारी रात्री आला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी रेल्वे पोलिसांना सतर्क करून तपास सुरू केला. अखेर कल्याण रेल्वे पोलिसांनी त्या कॉलरला पकडले.
गँगस्टर अनमोल बिश्नोईने अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर गोळीबार घडवून आणल्याचे प्रकरण सध्या गरम आहे. असे असतानाच शुक्रवारी रात्री मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एक धमकीचा फोन आला. लाल शर्ट घातलेली व्यक्ती दादर रेल्वे स्थानकात येणार असून त्यानंतर तो मुंबईत कुटाणा करणार असल्याचे सांगून कॉलरने फोन ठेवला. या कॉलची गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांनी तत्काळ रेल्वे पोलिसांना सतर्क केले. तसेच दादर, भोईवाडा, शिवाजी पार्क पोलिसांनादेखील सतर्क राहण्याची सूचना देण्यात आली. दरम्यान, कॉलरने धमकीचा फोन करून काही वेळाने फोन बंद केला होता. अखेर कल्याण रेल्वे पोलिसांना त्याला पकडण्यात यश आले. कल्याणच्या अशोक नगरात बहिणीकडे राहत असलेल्या चंद्रशेखर वामणे (32) या तरुणाला पोलिसांनी पकडले. दारूच्या नशेत कॉल केल्याचे चंद्रशेखर म्हणत असल्याचे समजते.
z चंद्रशेखर हा मूळचा धाराशीवच्या उमरगाचा आहे. विवाहित असलेला चंद्रशेखर कौटुंबिक कारणास्तव हैराण असून तो गेल्या दोन महिन्यांपासून कल्याण येथील बहिणीकडे राहण्यास आला होता. कामधंदा काही नसल्याने तो असाच हिंडत फिरत असतो. त्याला पुढील कारवाईसाठी दादर रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दादर पोलीस याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याच्याकडे अधिक चौकशी करीत आहेत.































































