नगरमध्ये ‘रेमडेसिविर’चा काळाबाजार करणाऱया दोन टोळ्यांचा पर्दाफाश, तिघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘रेमडेसिविर’ इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱया दोन टोळ्यांचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. याप्रकरणी दोन्ही टोळ्यांमधील सातजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून वाहनासह तीन इंजेक्शन्स असा सात लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

हेमंत दत्तत्राय कोहळ (रा. बोल्हेगाव), भागवत मधुकर बुधवंत (वय 20, रा. आदर्श कॉलनी, बोल्हेगाव) आणि आदित्य बाबासाहेब म्हस्के (वय 21, रा. माताजीनगर, एमआयडीसी) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. तर, महेश दशरथ मते (रा. बरबडेवस्ती, तपोवन रोड, नगर), प्रदीप मारुती मगर व अमर शिंदे (दोघे रा. तागडवस्ती, तपोवन रोड, नगर), अंकित कालिका मौर्य (रा. एमआयडीसी, नगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बालिकाश्रम रस्त्यावरील तारडे हॉस्पिटल परिसरात काही इसम रेमडेसिविर इंजेक्शनची जास्त दराने विक्री करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यानुसार कटके यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने रेमडेसिविर इंजेक्शनची विक्री करणाऱयाच्या मोबाईलवर बनावट ग्राहकाच्या मध्यस्थीने संपर्क साधला असता, रेमडेसिविरची किंमत 27 हजार रुपये सांगण्यात आली. बनावट ग्राहकाने त्यासाठी होकार दिला असता, 10 ते 15 मिनिटांनी तारडे हॉस्पिटल परिसरात येण्यास सांगितले. पथकाने बनावट ग्राहक खरेदीसाठी पाठवून सापळा रचून हेमंत कोहोळ याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ‘पोलिफॉर्म’ कंपनीचे एक रेमडेसिविर इंजेक्शन, एक मोबाईल व स्कॉर्पिओ असा एकूण सात लाख 12 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याने हे इंजेक्शन महेश मते, प्रदीप मगर व अमर शिंदे या तिघांकडून घेतल्याचे सांगितले. याप्रकरणी हेमंत कोहोळ, महेश मते, प्रदीप मगर, अमर शिंदे यांच्याविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोफखाना पोलीस तपास करीत आहेत.

यानंतर एमआयडीसीतील काकासाहेब म्हस्के मेडिकल कॉलेज परिसरात बनावट ग्राहक पाठवून भागवत बुधवंत व आदित्य म्हस्के यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे सन फार्मास्युटिकल कंपनीचे एक व सिप्ला कंपनीचे एक अशी दोन रेमडेसिविर इंजेक्शन्स, एक मोबाईल असा एकूण 20 हजार 450 रुपये किमतीचा मुद्देमाल सापडला. आरोपींनी रेमडेसिविर इंजेक्शन अंकित कालिका मौर्य याच्याकडून आणल्यास सांगितले. त्यामुळे मौर्य याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.