शेतीच्या कारणावरुन जबरदस्तीने विषारी औषध पाजवून जिवे मारण्याचा प्रयत्न, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

शेतीच्या कारणावरुन जबरदस्तीने राउंडअप नावाचं विषारी औषध पाजवून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना औसा तालुक्यातील हिप्परसोगा येथे घडली. या प्रकरणी तिघांविरुध्द औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औसा पोलीस ठाण्यात संजय रामराव पाटील (वय 54) रा. हिप्परसोगा यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, दिनांक 26 नोव्हेंबर रोजी फिर्यादी हे शेताकडे म्हशीचे दुध काढण्यासाठी जात होते. त्यावेळी निजाम नवाज शेख व इतर दोघेजण यांनी संगनमत करून फिर्यादीस हाक मारून थांबवले.

त्यांच्याजवळ जाऊन जमिनीच्या व मागील भांडणाची कुरापत काढून गळ्यातील मफलरने गळा आवळला व जबरदस्तीने निजाम शेख याच्या घरासमोरील पटांगणात ओढत नेले. जमिनीवर पाडून जिवे मारण्याच्या उद्देशाने राउंडअप नावाचे विषारी औषध तोंडात घातले. गंभीर अवस्थेत उपचारासाठी त्यांना लातूर येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक गायकवाड हे करीत आहेत.