ड्रग्ज केसची भीती घालून पैसे मागणाऱया तिघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जुहू कोळीवाडा येथे फिरण्यासाठी आलेल्या तरुणाला मारहाण करून त्याला ड्रग्जच्या खोटय़ा केसमध्ये अडकवू अशी भीती घालून पैसे घेतल्या प्रकरणी तिघांना सांताक्रुझ पोलिसांनी अटक केली. समीर नासिर हुसेन, राहुल मणिरका गुप्ता आणि सिद्धार्थ श्रवण सिंग अशी त्या तिघांची नावे आहेत.

तक्रारदार तरुण हा त्याच्या चार मित्रांसोबत शनिवारी रात्री वर्सोवा येथे जेवणासाठी गेला होता. जेवल्यानंतर रात्री ते चौघे फेरफटका मारण्यासाठी जुहू कोळीवाडा येथे आले. जुहू येथे आल्यावर एकाने तक्रारदाराला शिवीगाळ केली. त्यानंतर आणखी एकाने तरुणाला मारहाण केली. मारहाण केल्यामुळे तरुणासोबत असलेले चार जण घाबरले. तेव्हा एकाने जर आम्हाला दहा हजार रुपये दिले नाही तर ड्रग्जच्या खोटय़ा केसमध्ये अडकवू, आणि पाण्यात ढकलून देऊ अशी भीती घातली.

भीतीपोटी तक्रारदार तरुणाने खिशातून सहाशे रुपये काढून दिले. त्यानंतर तरुणासोबत असलेली तरुणी धावत बाहेर गेली. तेव्हा तिला गस्तीला असलेली सांताक्रूझ पोलिसांची गाडी दिसली. तिने घडल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस येत असल्याचे पाहून त्या तिघांनी पळ काढला. पळून जात असताना पोलिसांनी राहुलला पकडले. त्याच्या चौकशीत समीर आणि सिद्धार्थचे नाव समोर आले. त्या दोघाना अटक करून आज न्यायालयात हजर केले.