डॉक्टर असल्याचे सांगून फसवणूक केल्याप्रकरणी पती व सासू-सासरे यांना अटक

50

सामना प्रतिनिधी । कोपरगाव

कोपरगांव शहरातील रहिवासी असणाऱ्या युवतीला महेश संजय सुर्यवंशी याने डॉक्टर असल्याचे खोटे सांगून कुटूंबीयांची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील तीन आरोपींचा मंगळवारी कोपरगाव येथील जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याने अखेर पोलिसांनी न्यायालयाच्या आवारातच महिलेचे पती महेश संजय सूर्यवंशी,सासरा संजय शिवराम सूर्यवंशी व सासू शोभा संजय सूर्यवंशी या तिघांना मंगळवारी अटक केली. याबाबतची माहिती अॅड. चारुशीला शंतनू धोर्डे यांनी दिली.

शहरातील गांधीनगर भागात राहणाऱ्या एका डॉक्‍टर असलेल्या युवतीला महेश संजय सूर्यवंशी याने नाशिक जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी असल्याचे सांगून लग्न केले. मात्र, हा बनाव लक्षात आल्याने फसवणूक केल्याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांत शहरातील रहिवासी दंतरोगतज्ञ असलेल्या युवतीने पतीसह इतर 11 जणांविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आरोपी महेश सूर्यवंशी डॉक्टर असून तो नाशिक जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी असल्याचे खोटे सांगून त्याचे युवतीशी लग्न करण्यात आले होते. त्यांनी युवतीची आणि तिच्या कुटूंबीयांची फसवणूक केल्याचे उघड झाले. या युवतीचे महेशसोबत जुलै 2017 साली लग्न झाले होते. त्यानंतर 20 डिसेंबर 2018 पर्यंत त्यांचा संसार सुरळीत सुरू होता. त्यानंतर तिला व तिच्या वडिलांना आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी 10 जानेवारी 2019 रोजी कोपरगांव शहर पोलीस ठाण्यात 12 आरोपींविरुद् गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सर्व आरोपींनी कोपरगाव येथील जिल्हा सत्र न्यायालयाकडे जामिंनासाठी अर्ज दाखल केला होता. मंगळवारी अर्जावर सुनावणी होऊन तिघांचे अर्ज फेटाळण्यात आले. त्यामुळे न्यायालयाच्या आवारातच पोलिसांनी महेश सूर्यवंशी, संजय सूर्यवंशी व शोभा सूर्यवंशी यांना अटक केली. इतर आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या