
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
आयपीएलच्या 12 व्या मोसमातील अंतिम सामन्यासाठी आता अवघे काही तास बाकी राहिले आहेत. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज चौथ्यांदा फायलनमध्ये आमनेसामने आले आहेत. विशेष म्हणजे दोन्ही संघ आयपीएलच्या चौथ्या विजेतेपदासाठी भिडणार आहेत. यापूर्वी दोन्ही संघांनी तीन वेळा विजेतेपद पटकावले आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघात होणाऱ्या फायनलचे काही अजब योगायोग पाहुया…
पहिला योगायोग – जो संघ प्रथम फलंदाजी करणार तो जिंकणार?
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जचा संघ आतापर्यंत तीन वेळा फायलनमध्ये समोरासमोर आला आहे. तिन्ही वेळेस ज्या संघाने प्रथम फलंदाजी केली त्या संघाचा विजय झाला आहे. दोन्ही संघ सर्वात आधी 2010 ला फायनलमध्ये भिडले होते. त्यावेळी चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना मुंबईचा 22 धावांनी पराभव केला होता. 2013 मध्ये मुंबईने चेन्नईचा 23 धावांनी पराभव केला, तर 2015 मध्ये मुंबईने पुन्हा एकदा चेन्नईवर 41 धावांनी विजय मिळवला. तसेच 20174 मध्ये मुंबई आणि पुण्याचा संघ फायलनमध्ये समोर आला तेव्हाही मुंबईने रोमहर्षक सामन्यात 1 धावेने विजय मिळवला होता. त्यामुळे यंदाही जो संघ प्रथम फलंदाजी करेल त्याच्या विजयाची संधी जास्त आहे, अशी चर्चा सुरू आहे.
दुसरा योगायोग – करण शर्मा आणि चॅम्पियन?
चेन्नई सुपर किंग्जचा फिरकी गोलंदाज करण शर्मा जेव्हा अंतिम सामन्यात खेळतो तेव्हा चेन्नई चॅम्पियन होते. करण शर्माने 2016 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना अंतिम सामना खेळला होता आणि त्या संघाने विजय मिळवला होता. 2017 मध्ये करण शर्मा मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करत होता आणि त्या मोसमात मुंबई चॅम्पियन झाली होती. 2018 मध्ये करण शर्मा चेन्नईच्या संघात आला आणि चेन्नईने तिसऱ्यांदा आयपीएल चषक जिंकला. आता पुन्हा एकदा करण शर्माचे लक फॅक्टर चेन्नईला चॅम्पियन बनवते का हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.
तिसरा योगायोग – विषम वर्ष आणि मुंबई चॅम्पियन
अंकशास्त्रानुसार यंदा मुंबईचा चॅम्पियन होण्याचा दावा मजबूत दिसत आहे. कारण मुंबईने यापूर्वी आयपीएलमध्ये 2013, 2015 आणि 2017 या विषम वर्षाला चषक जिंकला आहे. 2013 पासून एक वर्ष सोडून मुंबईने विजय मिळवला आहे. त्यामुळे यंदाही (2019) मुंबईला विजयाची संधी दिसत आहे.
आजची अंतिम लढत
मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्ज
हैदराबाद, रात्री 7.30 वाजता.




























































