
काळबादेवीतील व्यापाऱयाच्या कार्यालयावर बनावट छापा टाकून लाखो रुपये लुटणाऱया तीन जीएसटी अधिकाऱयांना राज्य कर आयुक्तांनी घरचा रस्ता दाखवला आहे. कार्यालयाकडून कोणतीही परवानगी न घेता तीन वर्षांपूर्वी काळबादेवी येथील व्यावसायिक लालचंद वानीगोटा यांच्या कार्यालयात हितेश वसईकर, मच्छिंद्र कंगणे आणि प्रकाश शेगर यांनी छापा टाकत 11 लाख रुपयांची रक्कम जप्त केली होती. मात्र सदरच्या बेकायदेशीर कारवाईत तिघेही दोषी आढळल्याने राज्य कर आयुक्त राजीव मित्तल यांनी त्यांना नोकरीतून बडतर्फ करत त्याबाबतची जाहिरात वृत्तपत्रात दिली आहे.
लालचंद वानीगोटा यांच्या काळबादेवी येथील कार्यालयात हितेश वसईकरांसह तीन जीएसटी निरीक्षकांनी 14 जून 2021 रोजी छापा टाकला होता. त्यांनी आपली ओळखपत्रे दाखवत कार्यालयात असलेली रोकड दाखवण्याचे निर्देश दिले. त्यानुसार वानीगोटा यांनी आपल्या कामगाराला सांगत सर्व 30 लाख रुपयांची रोकड टेबलवर ठेवली. तेव्हा सदर रकमेची कागदपत्रे दाखवण्याची मागणी केली. त्यानुसार त्यांनी सर्व कागदपत्रे दाखवल्यानंतरही संबंधित अधिकारी करापोटी 11 लाख रुपये घेऊन गेले. त्यानंतर लालचंद यांनी माझगाव येथील जीएसटी कार्यालयात सदरच्या कारवाईबाबत चौकशी केली असता जीएसटी विभागाने अशी कोणतीही कारवाई केली नसल्याचे सांगितले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच लालचंद यांनी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार झालेल्या चौकशीत तिन्ही अधिकाऱयांची सीसीटीव्हीमुळे ओळख पटली होती. तसेच जीएसटी विभागाने केलेल्या खात्यांतर्गत केलेल्या चौकशीतही तिघे दोषी आढळल्याने त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई केली आहे.
जीएसटी विभागाची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न
जीएसटी विभागाची प्रतिमा मलिन बनली आहे. ती सुधारण्यासाठी ज्या अधिकाऱयांवर कारवाई केली आहे त्यांची नावे वृत्तपत्रात प्रसिद्ध केली असल्याचे आयुक्त राजीव मित्तल यांनी स्पष्ट केले आहे.



























































