तीन रुग्णालयांनी मृत घोषित केलेला रुग्ण जिवंत झाला, उत्तर प्रदेशमधील प्रकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका जिवंत असलेल्या व्यक्तिला एक नव्हे तर तीन रुग्णालयांनी मृत घोषित केल्याचा प्रकार उत्तर प्रदेशमध्ये घडला आहे. येथील मुरादाबाद जिल्ह्यातील पोलिसांसमोरच हा प्रकार उघड झाला आहे.

उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद जिल्ह्यात एक रस्ते अपघात घडला. या रस्ते अपघातात श्रीकेश नावाचे गृहस्थ गंभीर जखमी झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तीन वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. त्यातील पहिल्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू झाले. मात्र, काही वेळाने त्यांना मृत घोषित करण्यात आलं. पुढील दोन रुग्णालयांनी त्यांना मृत झाल्याचं कारण सांगून त्यांना दाखल करून घेण्यास नकार दिला.

अखेर त्यांच्या कुटुंबाने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण, तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं. त्यानंतर शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह शवागारात पाठवण्यात आला. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस पंचनामा करण्यासाठी आले तेव्हा त्यांना लक्षात आलं की या मृतदेहाचा श्वास सुरू आहे.

त्यांनी कुटुंबाला आणि डॉक्टरांना कळवलं. डॉक्टरांनी त्यांना तपासलं तेव्हा ते जिवंत असल्याचं लक्षात आलं. त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्यांच्यावर इलाज सुरू झाले. श्रीकेश जिवंत असल्याचं पाहून त्यांच्या कुटुंबात आनंद साजरा झाला.

हा दुर्मीळ प्रकार असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. पहिल्या रुग्णालयात त्यांनी श्रीकेशवर औषधोपचार केले होते. त्यामुळे काही काळ ते मृत असावेत असं वाटलं. पण, त्या औषधांचा परिणाम काही तासांनी दिसल्यामुळे ते जिवंत असल्याचं कळलं, अशी महिती डॉक्टरांनी दिली आहे.