Israel Hamas War – जेरुसलेममध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला; तीन इस्रायली ठार

इस्रायलमध्ये गुरुवारी सकाळच्या सुमारास जेरुसलेम शहराच्या ओल्ड सिटी प्रवेशद्वाराजवळ हमासच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले. या हल्ल्याला इस्रायलच्या सैनिकांनी प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. या हल्ल्यामुळे हमास आणि इस्रायल यांच्यातील तणाव आणखी वाढू शकतो.

कारमधून आलेल्या दहशतवाद्यांनी ओल्ड सिटी प्रवेशद्वाराजवळील बसस्टॉपवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. अचानक घडलेल्या या घटनेने नागरिकांची एकच धावपळ उडाली.  हे पाहताच त्या ठिकाणी ऑफ डय़ुटी असलेले इस्रायली सैनिक आणि काही सशस्त्र नागरिकांनी प्रत्युत्तरादाखल दहशतवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. हे दहशतवादी पूर्व जेरुसलेमचे राहणारे असून त्यांना याआधीही दहशतवादी कारवायांच्या आरोपाखाली तुरुंगात डांबण्यात आले होते. मुराद नेमर(38) आणि इब्राहिम नेमर(30) अशी मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत.

युद्धविराम आणखी एक दिवसाने वाढवला

कतारच्या मध्यस्थीने इस्रायल आणि हमास दोघांनी युद्धविराम आणखी एक दिवसाने वाढवण्याचा सहमती दर्शवली आहे. दरम्यान, सहाव्या दिवशी म्हणजेच गुरुवारी हमासने 16 ओलिसांना सोडले तर इस्रायलच्या ताब्यातील 30 पॅलेस्टिनी कैद्यांना सोडण्यात आले. या कैद्यांना वेस्ट बँकमध्ये आणून सोडण्यात आले.

मोठा शस्त्रसाठा जप्त

मारले गेलेले दहशतवादी हमास या संघटनेसाठी काम करत होते. मुराद याला 2010 आणि 2020 मध्ये दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपाखाली कैदेची शिक्षा झाली होती. तर इब्राहिमलादेखील 2014 मध्ये तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. हे दहशतवादी ज्या वाहनातून आले होते ते वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले असून या वाहनातून मोठय़ा प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. हल्ल्याच्या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये पैद झाला असून हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

बेंजामिन नेतन्याहू युद्धावर ठाम

हमासने सर्व ओलिसांना सोडल्यानंतर पुन्हा युद्ध छेडले जाईल, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले आहे. हमासला मुळापासून उखडून टाकण्यावर आपण ठाम असल्याचा पुनरुच्चार नेतन्याहू यांनी पुन्हा केला. गाझा पट्टीवर गेल्या 16 वर्षांपासून असलेले हमासचे वर्चस्व पूर्णपणे संपवून टाकायचे असल्याचा इस्रायलचा निर्धार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

इस्रायली सैनिकांनी वेस्ट बँकमध्ये 8 आणि 15 वर्षीय मुलांची गोळय़ा घालून हत्या केल्याचा दावा पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाने केला आहे. याबाबतचा व्हिडीओही त्यांनी व्हायरल केला असून यात एक मुलगा जमिनीवर पडल्याचे आणि बाकीची मुले पळ काढताना दिसत आहेत. n इस्रायली सैनिकांनी मात्र मुलांची हत्या केल्याचा दावा फेटाळला आहे. इस्लामिक जिहादच्या दहशतवाद्यांना मारल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच जे स्पह्टके फेकत आहेत त्यांनाच लक्ष्य करण्यात येत असल्याचेही सांगितले.