
नोकरीच्या तिसऱयाच दिवशी सोने चोरून पळालेल्या तिघांना अवघ्या 24 तासांत बोरिवली पोलिसांनी अटक केली. आरिफ उल शेख, मुर्शीद आलम आणि मुफीजल शेख इस्लाम अशी त्या तिघांची नावे आहेत. त्या तिघांनाही न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरिफ हा मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी आहे. तो एका सोन्याच्या वस्तू बनवण्याच्या कारखान्यात काम करत होता. झटपट श्रीमंत बनण्यासाठी त्याने कट रचला. त्याने मुर्शीद आणि मुफीजलला पश्चिम बंगाल येथून मुंबईत नोकरीसाठी बोलावून घेतले व बोरिवली येथील एका ओळखीच्या व्यक्तीकडे त्या दोघांना आरिफने कामाला लावले. तीन दिवस त्या दोघांनी काम केले. सोमवारी सकाळी मुर्शीद आणि मुफीजल हे सोन्याचे दागिने घेऊन काम करत बसले. तक्रारदार हे फोनवर बोलत असताना त्यांनी साडेसात लाख रुपयांचे दागिने घेऊन पळ काढला. याप्रकरणी तक्रारदारांनी बोरिवली पोलीस ठाणे गाठले.
पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. वरिष्ठ निरीक्षक लक्ष्मण डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश पाटील यांनी तपास सुरू केला. तपासाकरिता तीन पथके तयार केली. आरिफ हा रे रोड येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तर मुर्शीद आणि मुफीजल हे कल्याण येथून पश्चिम बंगालला जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्या दोघांना पोलिसांनी कल्याण येथून ताब्यात घेतले. आरिफने झटपट श्रीमंत होण्यासाठी हा कट रचल्याचे पोलीस तपासात उघड झाले. पोलिसांनी त्यांच्याकडून 2 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.


























































