सराईत वाहन चोराकडून तीन दुचाकी जप्त; लोणीकंद पोलिसांची कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरासह ग्रामीण भागातून दुचाकी चोरणाऱ्या सराईताला लोणीकंद पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून दीड लाख रूपये किंमतीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. लक्ष्मीकांत संभाजी वाघमारे (वय 28 रा. सणसवाडी, ता. शिरुर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी आदेश दिले होते. त्यानुसार तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुरज किरण गोरे हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी वाघोलीतील केसनंद फाटा चौकातील दुचाकीजवळ एकजण फिरत असल्याची माहिती पोलीस अंमलदार अमोल ढोणे यांना मिळाली. त्यानुसार पथक सापळा रचून घटनास्थळी गेले असता, संबंधित तरूण पोलिसांना बघून पळून जात होता.

काही अंतरावर पोलिसांनी पाठलाग करून लक्ष्मीकांत वाघमारे याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने वाघोली, पेरणे फाटा आणि सणसवाडी परिसरातून मिळून तीन दुचाकी चोरल्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त पंकज देशमुख लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, पोलीस निरीक्षक राजेश तटकरे पोलीस उपनिरीक्षक सुरज किरण गोरे, मोहन वाळके, सकाटे, अजित फरांदे, कैलास साळुके, विनायक साळवे, प्रशांत कर्णवर, समीर पिलाणे, बाळासाहेब तनपुरे, सागर शेडगे, पांडुरंग माने यांनी केली.