
सामना प्रतिनिधी, मुंबई
कचरा वेचण्याच्या बहाण्याने इमारतींमध्ये घुसायचे, मग तळमजल्यावरील बंद घरे हेरायची आणि मग व्यवस्थित फिल्डिंग लावून घर साफ करणाऱ्या टोळीला नवघर पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्या टोळीने केलेले दोन गुन्हे उघडकीस आणून ६० ग्रॅम सोने हस्तगत केले आहे.
नवघर पोलीस ठाण्यात दोन घरफोडीचे गुन्हे दाखल होते. दोन्ही गुन्हे तळमजल्यावरील घरात करण्यात आले होते. त्यामुळे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केल्यावर मूळचे जालनाचे असलेली महिला व पुरुषांची टोळी अशा पद्धतीने घरफोडी करीत असल्याचे समोर येताच प्रकाश आव्हाड, त्याची पत्नी पूजा, अणू पवन आव्हाड आणि अनिता बोऱ्हाडे अशा चौघांना पकडले. त्यांनी दोन घरफोड्या केल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून चोरीचे दागिने जप्त केल्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश भोसले यांनी सांगितले. हे चोर घाटकोपरचे कामराज नगर तसेच दिव्यातील श्लोक नगरात राहतात, पण गुन्हा एकत्र मिळून करतात. कचरा वेचण्याचा बहाणा करीत इमारतींमध्ये घुसतात. तळमजल्यावरील लोखंडाचे ग्रिल आहे अशा बंद खोल्यांना ते टार्गेट करतात.

































































