
सामना प्रतिनिधी । मुंबई
प्रवाशांकडून दंडाच्या स्वरूपात मिळालेल्या 43 लाख रुपयांच्या रकमेचा अपहार करणाऱया मध्य रेल्वेच्या बडतर्फ टीसीला अखेर रेल्वे पोलिसांनी अटक केली.
मध्य रेल्वेचा टीसी असलेल्या बी. आर. वैद्य याने अनेक वर्षे रेल्वे प्रशासनाची फसवणूक करून दंडाची रक्कम सरकारच्या तिजोरीत जमा न करता घोटाळा केला होता. या प्रकरणात मार्च 2018 मध्ये दोषी सिद्ध झाल्याने त्याला सेवेतून बडतर्फ केले होते. मध्य रेल्वे प्रवाशांकडून दंड वसूल करण्याकरिता ‘ईएफटी’ पावती बुक देते. त्याच्या या पावती पुस्तकात हिशेब जुळला नसल्याने त्याच्यावर 15 डिसेंबर 2017 मध्ये दोषारोप दाखल केले होते. आतापर्यंत त्याच्याकडून 28 लाख रुपये वसूल करणे बाकी असल्याने ही रक्कम आता त्याच्या निवृत्तीवेतनातून कापण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिली. चीफ तिकीट इन्स्पेक्टर डी. सी. पवार आणि एस. एन. पाटील, हेड तिकीट तपासनीस व्ही. एस. किटके यांनाही योग्य तपासणी न केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे.



























































