लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील एसी तिकीट महागणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

पांघरुणाच्या किमतीचा समावेश तिकिटातच करण्यात येणार असल्यामुळे पुढील सहा महिन्यांत एसी तिकिटाची किंमत वाढणार आहे. ‘कॅग’नेच तशी शिफारस केल्यामुळे तिकीट वाढवण्यापलीकडे रेल्वेकडे दुसरा पर्याय नाही. त्याचा फटका गरीब रथ आणि दुरांतोमधून प्रवास करणार्‍या सर्वसामान्यांनाही बसणार आहे.

गेल्या १२ वर्षांपासून गरीब रथ, दुरांतो तसेच इतर एक्सप्रेस गाड्यांमधील बेडरोलची किंमत वाढवलेली नाही. पांघरुणाच्या धुलाई आणि देखभाल खर्चात वाढ झालेली आहे. त्यामुळे काळानुसार तिकिटांच्याही दरात वाढ करणे आवश्यक असल्याचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग)चे म्हणणे आहे. तशी शिफारस ‘कॅग’ने रेल्वेकडे केली आहे. त्यामुळे गरीब रथ, दुरांतोसह इतर गाड्यांच्या तिकिटांमध्येही वाढ होणार आहे. दरम्यान, याबाबतची माहिती आम्हाला मिळाली असून तिकीटदरवाढीचा आढावा घेऊन दरवाढ करू, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे.

बेडरोलमध्ये दोन चादरी, एक लहान टॉवेल, कव्हरसह उशी आणि ब्लॅकेटचा समावेश आहे. त्यासाठी प्रत्येक प्रवाशाकडून २५ रुपये घेतले जातात. हे सगळे धुण्यासाठी, त्यांची देखभाल, त्या वाटण्यासाठी नेमलेल्या कर्मचार्‍याचा पगार याचा ताळमेल बसवून ‘कॅग’ने ही शिफारस केली आहे.