महाराष्ट्रातल्या वाघोबांची संख्या 20 टक्क्यांनी वाढली!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

गेल्या काही काळात वाघांच्या घटत्या संख्येवरून चिंतेत असणाऱ्या वन्यजीव प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. 2018च्या व्याघ्रगणनेनुसार, महाराष्ट्रातील वाघांची संख्या 20 टक्क्यांनी वाढली आहे. वाघांच्या अवयव आणि कातड्याची तस्करी हे वाघांची संख्या कमी होण्यामागचं एक मुख्य कारण होतं. मात्र 2014 पासून ते 2018 पर्यंत तस्करीला आळा घालण्यात राज्य सरकारला यश आल्यामुळे वाघांच्या संख्येत फरक पडला आहे. अर्थात अद्याप सरकारने या बाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.

याबाबत अधिक माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं की, 2014मध्ये राज्यातील वाघांची संख्या 245 पासून 204 वर येऊन ठेपली होती. त्याच्यामागील प्रमुख कारण वाघांच्या अवयवांची तस्करी हे होतं. मात्र, गेल्या चार वर्षांत वाघांच्या अवयवांची तस्करी करणारी जाळी उद्ध्वस्त करण्यात सरकारला यश आलं आहे. त्यामुळे वाघांचं आयुष्य आणि सुरक्षितता वाढली असून 2018च्या व्याघ्रगणनेनुसार वाघांची संख्या 20 टक्क्यांनी वाढली आहे. या खेरीज 250 बछडे जन्माला आल्याचीही नोंद करण्यात आली आहे. मात्र त्यांची प्रत्यक्ष व्याघ्रगणनेत गणती होण्यासाठी अजून दोन वर्षांचा अवधी असल्याचंही मुनगंटीवार यांनी स्षष्ट केलं आहे.

वाघांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होईल असे घटक फक्त शिकारी किंवा तस्कर नसून, मानव-वाघ संघर्ष, अन्नाची कमतरता आणि मानवाचं व्याघ्र परिक्षेत्रावरील अतिक्रमण हेही आहेत. महाराष्ट्रात मेळघाट, पेंच, ताडोबा, सह्याद्री, नवेगाव-नागझिरा आणि बोर हे व्याघ्रप्रकल्प आहेत. राज्यात अजूनही काही व्याघ्रप्रकल्प बनवण्याच्या विचारात राज्य सरकार असल्याचंही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं आहे. जेणेकरून मानव-वाघ हा संघर्ष टाळता येईल आणि वाघांच्या संख्यावाढीला पोषक वातावरण मिळू शकेल, असंही ते म्हणाले आहेत.