पोलीस कोठडीसमोर TikTok व्हिडीओ काढल्याने हवालदार निलंबित झाली, आता बनलीय आघाडीची अभिनेत्री

4188
फोटो- फेसबुकवरून साभार

अल्पिता चौधरी हे नाव अनेकांना माहिती नसेल मात्र गुजरातमधील बऱ्याच लोकांना हे नाव व्यवस्थित पद्धतीने माहिती आहे. TikTok टीकटॉक व्हिडीओ बनवण्याचं खूळ डोक्यात शिरलेल्यांपैकी अल्पिताही एक होती. या वेडापायी तिला पोलीस दलातून निलंबितही करण्यात आलं होतं. मात्र हा प्रसंग तिच्या आय़ुष्यात नवी संधी घेऊन आला. या संधीचा तिने व्यवस्थित फायदा उचलला आणि आता ती गुजरातमधील एक आघाडीची गायिका आणि अभिनेत्री म्हणून नावारुपाला यायला लागली आहे.

अल्पिता ही लोक रक्षक दलामध्ये हवालदार म्हणून कामाला होती. गेल्या वर्षी जुलै महिन्यात तिने एक व्हिडीओ चित्रीत केला होता. हा व्हिडीओ तिने टीकटॉकवर अपलोड केला आणि गुजरात पोलीस दलात खळबळ उडाली. मेहसाणा जिल्ह्यातील लांघनाज पोलीस ठाण्यातील कोठडीसमोर तिने हा व्हिडीओ चित्रीत केला होता. तिच्या या कृत्याबद्दल तिला तत्काळ निलंबित करण्यात आलं. निलंबित करण्यात आल्यानंतर तिने गुजराती लोकसंगीत गायक जिग्नेश कविराजसोबत मिळून एक गाण्यांचा अल्बम प्रसिद्ध केला. या अल्बमला तिने नाव दिलं होत ‘टीकटॉकनी दिवानी’ यानंतर तिने काही धार्मिक गाणीही गायली. यानंतर ती गुजरातमध्ये तुफान प्रसिद्ध झाली असून तिला आता चित्रपटांमध्ये काम करण्याच्याही ऑफर येऊ लागल्या आहेत. अल्पिताचा नवा अल्बम नुकताच प्रसिद्ध झाला आहे ज्याचं नाव ‘कची केरी, पकी केरी’ असं आहे.

अल्पिताने चित्रपटांच्या ऑफर अजून स्वीकारलेल्या नाहीत. तिला दलातून निलंबित करण्यात आलेलं असल्याने तिला हा निर्णय घेताना वरिष्ठांची परवानगी आवश्यक आहे. अल्पिताला 2016 साली पोलीस दलात नोकरी लागली होती. तिला लहानपणापासूनच अभिनेत्री, गायिका आणि मॉडेल व्हायचं होतं. तिचे वडील पोलिसांत होते आणि आपल्याप्रमाणे मुलीनेही पोलीस दलात नोकरी करावी अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांच्या इच्छेसाठी तिने पोलीस दलात नोकरी स्वीकारली. नोकरी करत असताना आपल्या मूळ स्वप्नांना मूठमाती देणं मला मान्य नव्हतं असं अल्पिताने म्हटलं आहे.

अल्पिताने आतापर्यंयत गाण्याच्या 4 व्हिडीओ अल्बममध्ये काम केलं आहे. या अल्बमुळे ती गुजरातमध्ये तुफान प्रसिद्ध झाली आहे. अल्पिता सध्या मेहसाणा जिल्ह्यातल्या कडी पोलीस ठाण्यात कामाला आहे. तिने सांगितलं की जेव्हा ती तपासाला किंवा बंदोबस्ताला पोलीस ठाण्याबाहेर पडते तेव्हा तिच्याभोवती सेल्फी घेणाऱ्यांचा गराडा पडतो. वरिष्ठांची परवानगी मिळाली तर मी चित्रपटात नक्की काम करेन असं अल्पिताने सांगितलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या