
हिंदुस्थानी हवाई दलात येत्या मार्च महिन्यापर्यंत 17 राफेल जेटची तैनाती पूर्ण होणार आहे. त्यापैकी 11 लढाऊ जेट आतापर्यंत देशात आली आहेत. हिंदुस्थानने फ्रान्सकडून 36 राफेल खरेदी करण्याचा करार केला आहे. या विमानांसाठी हिंदुस्थान 59 हजार कोटी रुपये मोजणार आहे, असे देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरादाखल माहिती दिली. एप्रिल 2022 पर्यंत सर्व 36 राफेल हिंदुस्थानच्या दिमतीला असतील. त्यामुळे हिंदुस्थानी हवाई दलाचे सामर्थ्य अनेक पटीने वाढेल आणि आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत कुणालाही होणार नाही, असेही संरक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केले. नवी हायटेक लढाऊ विमाने हिंदुस्थानच्या ताफ्यात शानदार सोहळ्यांनी सामील होणार आहेत.
























































