पृथ्वीवर लवकरच एलियन्स उतरणार, ‘टाईम ट्रॅव्हलर’द्वारे भविष्यात गेलेल्या व्यक्तीचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एलियन्स ही गोष्ट आतापर्यंत आपण फक्त सिनेमातून पाहिली आहे. जगात अनेक ठिकाणी स्पेसशीप दिसल्याचा दावा करण्यात येतो आणि यातून उतरलेल्या एलियन्सच्या चर्चाही सर्वत्र झडतात. तसेच अनेक लोक भविष्यात जाऊन आल्याचाही दावा करतात. मात्र यातील एकालाही याबाबत सबळ पुरावा देता आला नाही. परंतु आता एक व्यक्ती भविष्यात जाऊन आल्याचा पुराव्यासह दावा करत आहे.

अलेक्झँडर स्मिथ (Alexander Smith) नावाच्या एका व्यक्तीने आपण भविष्यात जाऊन आल्याचा दावा केला आहे. टाईम ट्रॅव्हलरच्या मदतीने आपण ‘2118’ या वर्षात जाऊन आलो असून पुरावा म्हणून तेथून काही फोटोही काढून आणल्याचे अलेक्झँडर स्मिथ याने म्हटले आहे. अलेक्झँडर स्मिथ याने हे फोटो सार्वजनिक केले असून हे फोटो पाहणारा प्रत्येक व्यक्ती अचंबित होत आहे.

‘एपेक्स टीव्ही’शी बोलताना अलेक्झँडर स्मिथ म्हणाला की, अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएच्या एका टॉप सिक्रेट मिशनसाठी माझी निवड झाली आणि हे मिशन पूर्ण करण्यासाठी 1981 मध्ये टाईम ट्रॅव्हलरच्या मदतीने भविष्यातील 2118 या सालात जाऊन आलो. टाईम ट्रॅव्हलरशी निगडीत हे पहिलेच मिशन होते. तिथे गेल्यानंतर आपल्याला पृथ्वीवर एलियन्स उतरल्याचे दिसले. ते माणसांहून अधिक स्मार्ट होते आणि माणसांना त्रासही देत होते. ते पृथ्वीवर रहात नव्हते, मात्र आपल्या दुनियेतून नेहमीच पृथ्वीवर येत होते आणि वेगवेगळ्या देशांच्या प्रमुखांच्या संपर्कात होते, असा दावाही अलेक्झँडर स्मिथ याने केला.

एवढेच नाही तर मुलाखतीदरम्यान अलेक्झँडर स्मिथ याने हे देखील सांगितले की 2118 मध्ये अमेरिका आणि उत्तर कोरियामध्ये तिसरे महायुद्ध होईल. आपला दावा लोकांनी खोडून काढू नये यासाठी त्याने एक फोटोही सार्वजनिक केला. यात काही उंचच उंच इमारती दिसत आहेत. हा फोटो आपण भविष्यात गेलो तेव्हा काढल्याचा दावा अलेक्झँडर स्मिथ याने केला. फोटोत दिसणाऱ्या गोष्टींचा त्याने ‘ग्रीन स्कायस्क्रेपर’ (green skyscraper) असा उल्लेख केला आणि भविष्यात बनणार असल्याचेही म्हटले. तसेच भविष्यात ग्लोबल वार्मिंग आणि वातावरण बदल यामुळे मानव जातीला धोका निर्माण होईल असेही तो म्हणाला.