
>>स्वरा सावंत
प्रचंड प्रमाणात तयार होणाऱ्या कचऱ्याचं विघटन कसं करायचं… आपण फक्त कचरा आपल्या घराबाहेर टाकून देतो. पण थोडा पर्यावरणाचा विचार करूया. घरातील कचऱ्याचा घरातच सदुपयोग करूया.
स्वयंपाक घरात तयार होणारा हिरवा कचरा उन्हात चांगला वाळवून घ्यावा. आपल्याकडे चांगले ऊन असते, शक्य असेल तर गच्चीवर मोकळ्या जागेत आहे तसा टाकून तो आधी सुकवावा. भाज्यांच्या देठांचे वा तत्सम कचऱ्याचे बारीक तुकडे करून घ्यावे, त्यामुळे कचरा वाळण्याची प्रक्रिया लवकर घडते. तसेच असा कचरा जाळीदार पृष्ठभागावर किंवा चाळणीवर लवकर वाळतो. फ्लॅटमधील छोटय़ा बाल्कनीत पेपर वर पसरवून हा कचरा चांगला वाळवून घ्यावा. वाळलेला कचरा हातात घेऊन पापडासारखा कुस्करावा, त्याचा कुरकुरीत आवाज आला तर तो कचरा तागाच्या अथवा सच्छिद्र गोणीत, पिशवीत भरून ठेवता येतो. तो कुंडीच्या पुनर्भरणासाठी (रिपॉटिंगसाठी) वापरता येतो. तसेच कुंडीतील झाडांच्या भोवती त्याचे आवरण (मिल्चग) केल्यास कुंडीतील, वाफ्यातील पाण्याचे कमी प्रमाणात बाष्पीभवन होते. यातून झाडांना पोषक तत्त्वही हळू हळू मिळतात व झाडे चांगली हिरवीगार टवटवीत होतात. म्हणजे घरच्या कचऱ्याचा घरीच चांगला वापर होऊ शकतो.
माठात बनणारे कंपोस्ट खत
यासाठी मातीचा झाकणासह माठ घ्यावा. घरातला सर्व प्रकारचा ओला कचरा बारीक करून घ्यावा. यात हिरवे पदार्थ व काळे पदार्थ सम प्रमाणात असावेत. माठ कुठेही गळत नाही याची खात्री करून घ्यावी. माठाच्या तळाला पातळ मातीचा थर द्या. या थरावर घरातील N घटक असलेल्या पदार्थांचे मिश्रण 1″ ते 3″ जाडीच्या थरामध्ये पसरा. एक मोठा चमचा ट्रायकोडर्मा पावडरची फवारणी करा. सर्व थर खुरप्याने चांगले वरखाली ढवळून घ्या. माठावर घट्ट झाकण लावा. 2 ते 3 दिवसांनी पुन्हा कचरा भरून वरीलप्रमाणे कृती करा. तसेच संपूर्ण कचरा वर-खाली करा. याप्रकारे कचरा हलवल्यामुळे विघटन प्रक्रियेत तयार झालेली उष्णता कमी होते. कचऱ्यात हवा खेळती राहून विघटन क्रियेचा वेग वाढतो. एक दोन महिन्यांत माठ भरू शकतो (घरातील कचऱ्याच्या प्रमाणावर), माठ संपूर्ण भरल्यानंतर माठाचे तोंड चिखलमाती वापरून बंद करावे. 20 दिवसांनंतर माठातील संपूर्ण कचऱ्याचे खतामध्ये रूपांतर होते. हे खत काढून झाडांसाठी वापरावे.
ओल्या कचऱ्यापासून खत
स्वयंपाकघरातील ओला कचरा म्हणजे जैविक, कुजणारा कचरा होय. ज्याचे नैसर्गिकरीत्या विघटन होऊन खत तयार होऊ शकते असा कचरा. प्रत्येक कुटुंबातली सरासरी चार माणसे गृहित धरली तरी प्रत्येक दिवशी 250 गॅम ओला कचरा तयार होतो. याप्रमाणे वर्षभरात 100 किलो कचरा तयार होतो. ओल्या कचऱ्याचे साधारण पुढीलप्रमाणे वर्गीकरण करता येईल- पहिला म्हणजे हिरवा कचरा ज्यात भाजीपाल्याच्या काडय़ा, फळांच्या साली, टरफले, देठं येतात तर दुसरा प्रकार म्हणजे वाया गेलेले अन्न, तर तिसरा खरकटे पाणी. या तिन्ही स्वरूपाचा कचरा बागेसाठी उपयुक्तच ठरतो.
कचऱ्याचे घरातच वर्गीकरण
- स्वयंपाक घरातील ओटा
मुख्यतः हे काम गृहिणीचे आहे. भाजी, फळे, निर्माल्य, नारळाच्या शेंडय़ा, कांद्याची टरफले (स्वयंपाकघरात लागणाऱ्या वस्तूंची निवड केल्यानंतर उरलेले भाग) कचरा तसेच देवघरातील निर्माल्य, कागदाचे तुकडे हे गांडूळ खतासाठी वापरता येते. या कचऱ्यापासून उत्तम प्रतीचे गांडूळ खत तयार होते.
- भांडी घासण्याची जागा
भांडी घासावयाच्या ठिकाणी ठेवलेल्या बादलीत भांडी घासताना, जेवणाच्या ताटात उरलेले, पातेल्यातले शिजवून उरलेले पदार्थ, चहाच्या पातेल्यातला चोथा असे हे सर्व पदार्थ एकत्र करण्यात येतात. साधारणपणे खरकटी भांडी आधी स्वच्छ विसळून घेऊन नंतर घासल्या जातात. ही भांडी स्वच्छ केलेले पाणी एका बादलीत एकत्र जमा केले जाते. खरकटे पाणी व अन्य पदार्थ बायोगॅस संयंत्रामध्ये टाकून त्यापासून गॅस तयार होतो. तो गॅस स्वयंपाकघरात पाइपच्या साहाय्याने आपण स्वयंपाकासाठी वापरला जातो.
- बेसीनच्या खालची जागा
बेसीनखाली ठेवलेल्या बादलीत रिकाम्या बाटल्या, टय़ूब, खराब बल्ब व कप-बशा, प्लॅस्टिकच्या पिशव्या इ. सुका कचरा भंगारवाल्याला देता येतो. सुका कचरा ओल्या कचऱ्यापासून वेगळा ठेवण्यास यामुळे मदत होते.
कचरा हाताळताना
> काही विशिष्ट प्रकारच्या जिवाणू आणि किटाणूंमुळेच कचऱ्याचे खतात रूपांतर होते. ते सर्व घटक जमिनीकरिता उपयुक्त आहेत. इतर रोगकारक जिवाणू यात जगत नाहीत. यामुळे आरोग्यविषयक निश्चित राहून या कामाला सुरुवात करा.
> खत तयार करताना उगाच जड नावाच्या साधनांचा बाऊ करू नका. कचरा हलवण्यासाठी बागकामाचा चिमटा एवढंच साधन पुरेसे आहे.
> उंदीर, माशा, मुंग्या खताकडे आकर्षित होत नाहीत. जर तसे झाले तर आपले खत अजून तयार झालेले नाही असे समजावे. यासाठी कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर पाणी शिंपडून कचरा ओला करून ठेवावा.
> खत तयार करताना कचरा हाताळणे अत्यंत सुरक्षित आहे. फक्त बागकाम करताना काळजी घ्यावी लागते. खतासाठी लागणाऱ्या कचऱ्याचा ढीग गरम करण्याची गरज भासत नाही.
> कचरा साठवणूक केल्यानंतर कुठल्याही प्रकारच्या रोगाचा आणि किडीचा प्रसार होत नाही. उलट यातील दमट तापमानामुळे तसेच जिवाणूंमुळे रोग आणि किडी नष्ट होतात.
> इतर रोपांमध्ये उगवलेले गवत, विषारी वनस्पती खताच्या बास्केटमध्ये टाकता येतात. खत तयार होताना त्यातील विषारी घटक नष्ट होतात.
काही लक्षात ठेवण्याच्या गोष्टी
> सुरुवातीला तुमच्या खताच्या डब्यात कोणतेही शिजवलेले, प्रक्रिया केलेले पदार्थ, दुधापासून तयार केलेले पदार्थ, मांसाहारी पदार्थ अजिबात टाकू नयेत. अन्यथा अळय़ा, उंदीर यांचा उपद्रव होईल.
> शक्यतो फळांचे टाकाऊ पदार्थ वापरू नयेत. त्यातील गोड चवीमुळे मुंग्यांचा आणि विशिष्ट प्रकारच्या फ्रूट फ्लाईज यांचा त्रास होऊ शकतो. काहीजणांना साध्या केळय़ांच्या सालीमुळेसुद्धा फ्रूट फ्लाईजचा त्रास होतो. भाजीपाल्यांचा वापर उत्तम.
> सगळा कचरा बारीक कापून टाकल्यास फार लवकर कुजतो. नंतर कचरा हलवण्यासही सोईचे होते.
> रोज टाकलेला ओला कचरा नेहमी सुक्या कचऱ्याने झाका. माशांचा त्रास होऊ नये यासाठी डबा झाकूनच ठेवा.
> सुका कचरा म्हणून काही जण वर्तमानपत्राचा कागद किंवा पुठ्ठय़ांचे तुकडे वापरायचा सल्ला देतात. पण मी सहसा वापरत नाही. कारण अशा कागदामध्ये इतर अनेक रसायने असू शकतात. शिवाय अशा कागदांमुळे कुत्र्याच्या छत्र्या खूप उगवतात.




























































