काळी वर्तुळे…No problem?

1084

डोळ्याखालील काळी वर्तुळे कोणाच्याही सौंदर्यात बाधा आणतात. पण डोळ्याखाली ही वर्तुळे अपुऱ्या झोपेमुळेच होतात असे नाही. तर  प्रदूषण, धूम्रपान, सकस आहाराची कमी किंवा इतर कारणांमुळेदेखील डोळ्याखाली वर्तुळे होऊ शकतात. ती घालवण्यासाठी जाणून घेऊया काही घरगुती उपचार.

दूधbe

दूध त्वचेला मऊ ठेवण्यास मदत करते. यामध्ये लॅक्टिक ऑसिड असते. डोळ्याखालील काळी वर्तुळे आणि सूज कमी करण्यासाठी दूध गुणकारी मानले जाते. यासाठी थंड दुधामध्ये कापसाचे बोळे भिजत ठेवा आणि यांना डोळ्याच्या खाली ठेवा. पंधरा मिनिटे ते बोळे डोळ्यावर राहू द्या. हा उपाय जेवढा जास्त कराल तेवढा लवकर डोळ्याखालील काळे वर्तुळ दूर होतील.

काकडीचे स्लाइस (तुकडे)

काकडीमध्ये पाण्याचा अंश जास्त असल्याने ती आरोग्यासाठी चांगली असते. काकडी अर्धा तास प्रीजमध्ये ठेवून नंतर त्या काकडीच्या गोल चकत्या करून डोळ्यावर ठेवाव्यात. वीस मिनिटे डोळ्यांवर तसेच ठेवावे. काळी वर्तुळे दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर डोळ्याच्या खालील सूजदेखील कमी होते.

गुलाब जल

अनेक नैसर्गिक गुण असलेले गुलाब जल परिणामकारक आणि थंडावा देण्याचे काम करते. दोन मोठे चमचे गुलाब जलात काही मिनिट कापसाचे बोळे भिजत ठेवा. नंतर डोळे बंद करून भिजलेले कापसाचे बोळे डोळ्यावर ठेवा. पंधरा मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. या उपायाने डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर होतील.

ग्रीन टी बॅग

ग्रीन टी बॅग डोळ्याखालील काळे वर्तुळ कमी करण्यासाठी मदत करू शकतात. कारण यामध्ये असलेले गुण डोळे ताजेतवाने करतात आणि काळी वर्तुळे दूर करण्यास मदत करतात. केवळ दोन ग्रीन टी बॅगची गरज आहे. टी-बॅग पाण्यात बुडवा आणि 30 मिनिट प्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा. यानंतर थंड टी बॅग आपल्या डोळ्यावर ठेवा आणि 15 मिनिटे तसेच राहू द्या. यानंतर आपल्या डोळ्यांना साध्या पाण्याने धुवा. हा उपाय दिवसातून एकदा करू शकता.

कोरफड जेल

कोरफडीची जेल त्वचेतील ओलावा राखण्यासाठी आणि पोषण देण्यासाठी प्रभावी आहे. कोरफडीचे ताजे पान घेऊन त्यातला गर काढा. बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या एलोवेरा जेलचाही वापर तुम्ही करू शकाल. डोळ्याखाली कोरफडीचा गर लावा आणि हळूहळू मालिश करा.  यानंतर 10-15 मिनिटे तसेच राहू द्या. 10 मिनिटानंतर यास कापसाच्या मदतीने स्वच्छ करा.

मध

मध त्वचेला पोषण देण्यासोबतच त्वचा कोमल बनवते. डोळ्याच्या खाली मध लावा आणि वीस मिनिटे तसेच ठेवा. यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा आणि कोरडे होऊ द्या. दररोज हा उपाय दोन वेळा करू शकता.

लिंबाचा रस

लिंबाचा रस हा मृत त्वचा काढण्यासाठी आणि त्वचा तजेलदार करण्यासाठी मदत करते. कापसाच्या मदतीने डोळ्याखाली लिंबाचा रस लावून दहा मिनिटे तसाच राहू द्या आणि नंतर साध्या पाण्याने धुऊन घ्या. हा उपाय दिवसातून दोनवेळा करू शकता. सकाळी आणि रात्री करू शकता.

आपली प्रतिक्रिया द्या