
अटलांटिक महासागरात हरवलेल्या टायटन या पाणबुडीचा शोध लागला आहे. रोबोटच्या मदतीने या पाणबुडीचे अवशेष सापडले आहेत. टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी समुद्रसपाटीपासून 13,000 फूट खाली गेलेल्या टायटन पाणबुडीतील पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
टायटॅनिक पर्यटनासाठी ओशनगेट कंपनीची टायटन पाणबुडी 18 जून रोजी रवाना झाली होती. मात्र पहिल्या काही तासातच तिचा संपर्क तुटला आणि तेव्हापासून या पाणबुडीच्या अपघाताची शक्यता वर्तवली जात होती. प्रदीर्घ मोहिमेनंतर पाणबुडीमध्ये स्फोट होऊन त्यातील सर्व लोक ठार झाल्याची माहिती मिळाली आहे.
अब्जाधीश उद्योगपती आणि ओशनगेट कंपनीचे सीईओ स्टॉकटन रश यांचाही या पाणबुडीतील मृतांमध्ये समावेश आहे. याशिवाय या पाणबुडीत पाकिस्तानी वंशाचे अब्जाधीश प्रिन्स दाऊद आणि त्यांचा मुलगा सुलेमान दाऊदही होते. एवढेच नाही तर पॉल हेन्री नार्गियालेट, हमिश हार्डिंग यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. आतापर्यंत केलेल्या तपासात पाणबुडीमध्ये स्फोट झाल्याचे समोर आले आहे, त्यानंतर ही दुर्घटना घडली आहे. कॅनडाच्या एका जहाजावर तैनात असलेल्या रोबोटच्या माध्यमातून पाणबुडीचे अवशेष शोधण्यात आले आहेत.
समुद्रात 5 ठिकाणी टायटन पाणबुडीचे अवशेष दिसल्याची चर्चा समोर आली आहे. ओशनगेटने मृतांना श्रद्धांजली वाहणारे निवेदन जारी केले. या दुर्घटनेनंतर टायटॅनिकच्या पर्यटनावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
सध्या या पाणबुडीचे अवशेष बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आधुनिक C-130 हरक्यूलिस, P-8 सह 16 विमाने या पाणबुडीचा शोध घेत होती. आता या पाणबुडीचे अवशेष बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहेत. पाणबुडीचे अवशेष बाहेर काढल्यानंतर होणार्या तपासातच अपघाताचे ठोस कारण समोर येईल.


























































