
छोटय़ा पडद्यावरील ‘ज्ञानेश्वर माऊली’ या मालिकेने प्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन केले आहे. संतांची परंपरा उलगडणारी ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. माऊली आणि त्यांच्या भावंडांचे चमत्कार, रेडय़ामुखी वेद, श्रीसार्थ ज्ञानेश्वरी, विश्वरूप दर्शन, पसायदान हे सगळे प्रेक्षकांना आवडले. आता मालिकेत विविध संतांची मांदियाळी अनुभवायला मिळणार आहे. या प्रवासाची सुरुवात संत कान्होपात्रा यांच्यापासून होणार आहे. संत कान्होपात्रा ही व्यक्तिरेखा अभिनेत्री तितिक्षा तावडे साकारणार आहे.
तितिक्षाने याआधी छोटय़ा पडद्यावर विविध भूमिका साकारून प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. आता ती नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. साधी साडी, हातात वीणा आणि चिपळय़ा, अशा मोहक रूपात ती दिसेल. विठ्ठलाची निस्सीम भक्त असलेली कान्होपात्रा आणि ज्ञानेश्वर माऊली यांच्या भेटीची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. सोमवार ते शनिवारी सायंकाळी 7 वाजता सोनी मराठीवर हा कार्यक्रम पाहता येईल.































































