
तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यातील लोकसभेच्या सर्व 42 जागा स्वबळाकर लढणार असल्याचे आज जाहीर केले. त्याच वेळी तृणमूल काँग्रेसने हा राज्यापुरता निर्णय घेतला असून राष्ट्रीय पातळीवर आम्ही इंडिया आघाडीतच राहणार असल्याचेही ममतांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, आम आदमी पक्षानेही पंजाबमध्ये तशीच भूमिका घेत राज्यातील सर्व जागा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेसकडे मी जागावाटपाचा प्रस्ताव ठेवला होता. या प्रस्तावाला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे राज्यात स्वबळावर लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय पक्षाने घेतल्याचे ममता बॅनर्जी यांनी नमूद केले. ममतांच्या स्वबळाच्या घोषणेनंतर काँग्रेसने लगेचच प्रतिक्रिया दिली असून ममतांशिवाय इंडिया आघाडीचा विचारही केला जाऊ शकत नाही. त्या आघाडीतील भक्कम आधारस्तंभांपैकी एक आहेत, असे काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले. इंडिया आघाडी पश्चिम बंगालमध्ये एकजुटीने लढेल आणि विजयी होईल असा विश्वासही रमेश यांनी व्यक्त केला.
नेमके काय आहे गणित?
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने बंगालमध्ये 10 ते 12 जागांची मागणी केली आहे तर, काँग्रेसने वास्तवाचे भान ठेवावे असे सांगत तृणमूलने काँग्रेसला दोन जागा देऊ केल्या आहेत. 2019च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने याच दोन जागा जिंकल्या होत्या. याशिवाय पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांचाही प्रभाव असून ते इंडिया आघाडीत सामील आहेत.
इंडिया आघाडी भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी उभी राहिली आहे. भाजप विरोध हा आमचा सगळय़ांचा समान अजेंडा असून त्यासाठी जे काही करावे लागेल ते आम्ही करणारच आहोत. काँग्रेसने देशात 300 जागा लढवाव्या. बाकी जागा इंडिया आघाडीतील प्रादेशिक पक्ष लढतील. इंडिया आघाडीचा घटक म्हणून निकडणुकीनंतर आम्ही एक निश्चित भूमिका घेऊ.
दिल्ली आणि गुजरातमध्ये एकमत
अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये वेगळी भूमिका घेतली आहे. राज्यात आप एकटय़ाने लोकसभा निवडणूक लढवेल. आम्ही लोकसभेच्या राज्यातील 13 जागांवर काँग्रेससोबत युती करणार नाही, असे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज सांगितले. दिल्ली आणि गुजरातमध्ये मात्र आप आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावर एकमत झाले आहे.



























































