
शिवडी दंडाधिकाऱ्यांनी बजावलेले समन्स रद्द
राष्ट्रगीताच्या कथित अवमान प्रकरणात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांना गुरुवारी मुंबईच्या सत्र न्यायालयाने दिलासा दिला. ममता बॅनर्जी यांच्याविरोधात शिवडीच्या महानगर दंडाधिकाऱ्यांनी बजावलेले समन्स सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांनी रद्द केले. याचवेळी या प्रकरणातील तक्रारदाराचा जबाब पडताळणीच्या टप्प्यापासून संपूर्ण कार्यवाही पुन्हा सुरू करण्याचे निर्देश दंडाधिकारी न्यायालयाला दिले.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात 1 डिसेंबर 2021 रोजी सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाच्या शेवटी ममता बॅनर्जी यांनी बसून राष्ट्रगीत बोलण्यास सुरुवात केली. नंतर उभे राहून राष्ट्रगीताच्या दोन ओळी म्हणून कार्यक्रमातून निघून गेल्या. त्यांच्या या कृतीमुळे राष्ट्रगीताचा अवमान झाल्याचा दावा करीत भाजपचे मुंबई सचिव विवेकानंद गुप्ता यांनी शिवडी दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली होती.

























































