हॅप्पी दिवाळी! ठाणे परिवहनचे 613 कर्मचारी सेवेत कायम होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, ठाणे

ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेत अस्थायी स्वरूपात काम करणारे 613 कर्मचारी डिसेंबरपासून कायम होणार आहेत. शिवसेनेच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आयुक्तांनी अस्थायी कर्मचाऱ्यांना कायम नोकरीत सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गेल्या 14 वर्षांपासूनचा या कर्मचाऱयांचा वनवास संपणार आहे. ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर आज ही गोड बातमी मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी फटाके फोडून आणि एकमेकांना मिठाई भरवून एकच जल्लोष साजरा केला.

गेल्या 14 वर्षांपासून परिवहन सेवेत अस्थायी स्वरूपात कर्तव्य बजावणारे सुमारे 613 चालक, वाहक कायम नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. ठाणे महापालिकेने नोकरीत कायम करून घ्यावे यासाठी टीएमटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गणेश देशमुख तसेच कर्मचारी अनेक वर्ष प्रयत्न करीत होते. तसेच माजी परिवहन सभापती अनिल भोर, परिवहन सदस्य राजेंद्र महाडिक, प्रकाश पायरे, दशरथ यादव, राजेश मोरे, जेरी डेव्हीड, संजय भोसले यांनी प्रयत्न केले. काही महिन्यांपूर्वी यासंदर्भात शिवसेना नेते, पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची बैठक झाली. यावेळी सकारात्मक प्रतिसाद देत आयुक्तांनी अस्थायी कर्मचाऱयांना कायम नोकरीत सामावून घेण्याची हमी दिली होती. त्यानुसार आयुक्त जयस्वाल यांनी हा निर्णय घेतला असून आज महापौर मीनाक्षी शिंदे, उपमहापौर रमाकांत मढवी, सभागृहनेते नरेश म्हस्के, स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांच्या उपस्थितीत ही गोड बातमी दिली.

पालिकेतील कंत्राटी कामगारांना किमान केतनाच्या फरकाची रक्कम
ठाणे महापालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार फरकाची रक्कम पाच टप्प्यांत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही आज जाहीर करण्यात आला. याचा फायदा घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे कंत्राटी पद्धतीने काम करणारे 206 कुशल आणि 1546 अकुशल कामगार, आरोग्य विभागाकडील 232 कर्मचाऱ्यांसह इतर विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना होणार आहे. याशिवाय वेतन त्रुटी दूर करण्याचा, सहाव्या वेतन आयोगानुसार विविध भत्ते लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. पालिका कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी शिवसेना नेहमीच प्रयत्न करणार, असे यावेळी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी सांगितले, तर कामगारहिताचे धडाकेबाज निर्णय घेतल्याबद्दल सभागृहनेते नरेश म्हस्के यांनी पालिका आयुक्तांचे कौतुक केले.

शिवसेनेची वचनपूर्ती
कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या मार्गी लावत असताना अस्थायी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेण्यासाठी सर्व प्रयत्न करणार असल्याची ग्वाही शिवसेना नेते, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीएमटी कर्मचारी संघटनेच्या निवडणुकीच्या वेळी दिली होती. या वचनाची पूर्ती आता लवकरच होणार आहे.

summary- tmt employees got permanent in job