
ज्या स्टार खेळाडूंकडून टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदकांच्या अपेक्षा होत्या त्या सर्व खेळाडूंनी भ्रमनिरास केला. मात्र थाळीफेकपटू कमलप्रीत काwर हिने शनिवारी पात्रता फेरीत कमाल केल्याने तिच्याकडून देशवासीयांना पदकाची आशा निर्माण झाली आहे. स्वतःच्या राष्ट्रीय विक्रमाइतकी जरी थाळी फेकली तरी कमलप्रीतला पदक मिळणार आहे. त्यामुळे उद्या सोमवारी अंतिम फेरीत पंजाबच्या या कुडीने सर्वोत्तम कामगिरी करीत देशाला पदक जिंकून दिल्यास नवा इतिहास घडणार आहे.
राष्ट्रीय विक्रमामुळेच…
कमलप्रीत कौरने पात्रता फेरीत 64 मीटर थाळी फेकून एकूण स्पर्धकांमध्ये दुसरे स्थान मिळवले. शिवाय रियो ऑलिम्पिकमध्ये क्युबाच्या डेनिया पॅबेलरो हिने 65.34 मीटर थाळी फेकून कास्य पदक जिंकले होते. कमलप्रीतने जूनमध्ये 66.59 मीटर थाळी फेकून नवा राष्ट्रीय विक्रम केलेला आहे. त्यामुळे टोकियो ऑलिम्पिकमध्ये ती नक्कीच देशाला पदक जिंकून देऊ शकते.
दुती चंद, संजीव, तोमरही उद्या मैदानात
उद्या अॅथलेटिक्समध्ये 200 मीटर धावणे शर्यतीत हिंदुस्थानची महिला खेळाडू दुती चंद मैदानात उतरणार आहे. शिवाय नेमबाजीतील अखेरची आशा असलेल्या ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर व संजीव राजपूतच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारातील कामगिरीवरही देशवासीयांच्या नजरा असणार आहेत.
हिंदुस्थानी महिला हॉकीपटू ऑस्ट्रेलियाशी भिडणार
हिंदुस्थानी महिला हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली असून आता सोमवारी त्यांची गाठ ऑस्ट्रेलियाशी पडणार आहे. गटसाखळी फेरीत तीन पराभवानंतर मिळालेल्या लागोपाठच्या दोन विजयाने हिंदुस्थानी संघाचे मनोबल उंचावलेले आहे. त्यामुळे हा संघ सोमवारी ऑस्ट्रेलियाचा कसा सामना करतो, याकडे देशवासीयांच्या नजरा असणार आहेत.





























































