#Tokyo Olympic – गेल्या जन्माचं पाप… पहिल्या प्रतिक्रियेवेळी लव्हलिना बोर्गोहेननं बोलून दाखवली व्यथा

‘म्हारी छोरियां छोरों से कम हैं के..’ हा दंगल चित्रपटातील डायलॉग खूप गाजला. काहीसा तसाच अनुभव महिला बॉक्सर लव्हलिना आणि तिच्या वडिलांच्या बाबतीत घडला आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये उपांत्यफेरीपर्यंत धडक मारून कांस्य पदकावर नाव करणाऱ्या महिला बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन हिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र शारीरिक मेहनेत आणि अडथळ्यांना पार करण्यापेक्षाही मानसिक आणि सामाजिक अंधश्रद्धांचे अडथळे पार करून इथपर्यंत पोहोचणं कठीण होतं असं लव्हलिना हिनं सांगितलं.

ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावल्यानंतर IndiaToday सोबत बोलताना लव्हलिनानं आपलं मन मोकळं केलं. ती म्हणाली, इथं पर्यंतचा प्रवास हा नक्कीच कठीण होता. पहिला अडथळा म्हणजे घरात आम्ही तीन मुली. आमच्या वडिलांना गावातली मंडळी, नातेवाईक म्हणायचे की गेल्या जन्मी पाप केलं म्हणून तुम्हाला तिन्ही मुलीच झाल्या. इथून ही अडथळा शर्यत सुरू झाली. त्यानंतर स्त्री असून बॉक्सिंग खेळणं त्यामुळे लोकं टीका करायचे, अशा शब्दात तिनं आपली व्यथा मांडली.

यासोबतच खेळावर लक्ष देण्यासाठी, शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी मला अनेक गो।ष्टींचा त्याग करावा लागला. जसे की बाहेरचे चटपटीत पदार्थ कधी खाल्ले नाहीत. कधी बाहेर कुठे फिरायला गेले नाही. तयारीसाठी घरापासून दूर रहावं लागलं. आईवडिलांसोबत राहता आलं नाही होत नाही, असं ती म्हणाली.

आईच्या मोठ्या आजारपणातही केवळ एक दिवस हॉस्पिटलमध्ये ती जाऊ शकली. तरी आईची भेट झाली नाही. फोनवर बोलणं झाल्याचंही ती यावेळी म्हणाली.

इतकंच नाही तर गेल्या सहा महिन्यांपासून ती सोशल मीडियापासून पूर्ण दूर होती. खेळावर लक्ष द्यायचं असल्यानं तिनं सोशल मीडियाचा वापर पूर्णपणे थांबवला असल्याचंही तिनं माध्यमाशी बोलताना सांगितलं.

आपली प्रतिक्रिया द्या