
हिंदुस्थानच्या पुरुष हॉकी संघाने तब्बल 41 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपवला. कास्य पदकासाठी झालेल्या थरारक लढतीत हिंदुस्थानने जर्मनीचा पराभव करून इतिहास घडवला. याआधी हिंदुस्थानने 1980च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये अखेरचे पदक जिंकले होते. त्यानंतर थेट 2021च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून हिंदुस्थानने पुन्हा एकदा हॉकीतील सुवर्णयुगाची सुरुवात केली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 3-1 अशा पिछाडीनंतर हिंदुस्थानने लढतीत जबरदस्त पुनरागमन करत विजय मिळविला अन् कास्य पदकावर आपले नाव कोरले.
हिंदुस्थानचे चोख प्रत्युत्तर
दुसऱया क्वॉर्टरमध्ये हिंदुस्थानने दुसऱया मिनिटालाच गोल करून 1-1 अशी बरोबरी साधली. सिमरनजित सिंगने 17व्या मिनिटाला हा गोल केला. त्यानंतर वेलेनने 24व्या, तर फर्पने 25व्या मिनिटाला गोल करून जर्मनीला 3-1 अशी मोठी आघाडी मिळवून दिली. मात्र हिंदुस्थानी हॉकीपटूंनी जर्मनीच्या तोडीस तोड खेळ करीत गोल केले. हार्दिक सिंगने 27व्या, तर हरमनप्रीत सिंगने 29व्या मिनिटाला गोल करून मध्यंतरापूर्वी हिंदुस्थानला 3-3 अशी महत्त्वपूर्ण बरोबरी साधून दिली.
विजेत्या हॉकीपटूंवर बक्षिसांचा वर्षाव
टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावत संस्मरणीय कामगिरी करणाऱया हिंदुस्थानी हॉकीपटूंवर बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला आहे. पंजाब सरकारकडून तेथील हॉकीपटूंना प्रत्येकी एक कोटी बक्षिसाच्या रूपात देण्यात येणार आहेत. हरयाणा सरकारकडून तेथील हॉकीपटूंना प्रत्येकी अडीच कोटी रूपये व क्रीडा खात्यात नोकरी देण्यात येणार आहे. याचसोबत कमीतकमी भावामध्ये त्यांना जागाही देण्यात येणार आहे. मध्य प्रदेश सरकारकडूनही प्रत्येकी एक कोटी रूपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
मध्यंतरानंतर हिंदुस्थानचे वर्चस्व
पूर्वार्धानंतर तिसऱया क्वॉर्टरच्या सुरुवातीलाच म्हणजे 31व्या मिनिटाला रूकिंदर पाल सिंगने पेनल्टी स्ट्रोकवर गोल करून हिंदुस्थानला 4-3 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर तीनच मिनिटांनी सिमरनजितने सुरेख गोल करून हिंदुस्थानची आघाडी 5-3 अशी भक्कम केली. तिसऱया क्वॉर्टरचा खेळ संपला तेव्हा हिंदुस्थानकडे आघाडी कायम होती. चौथ्या क्वॉर्टरमध्ये हिंदुस्थानने आघाडी राखत लढतीत वर्चस्व गाजवले. मात्र तरीही जर्मनीने एक गोल करून 4-5 असे अंतर कमी केले.
हिंदुस्थानचा सुवर्णकाळ
हिंदुस्थानच्या पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये आठ सुवर्ण पदके जिंकलेली आहेत. या आधी हिंदुस्थाने 1928, 1932, 1936, 1948, 1952, 1956, 1964 व 1980च्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. याचबरोबर हिंदुस्थानने 1960च्या ऑलिम्पिकमध्ये रौप्य, तर 1968, 1972च्या ऑलिम्पिकमध्ये कास्य पदक मिळवले होते. यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये आणखी एका कास्य पदकाची भर पडली.






























































