#TokyoOlympics – हिंदुस्थानी महिला हॉकी संघाचा जर्मनीने 2-0 ने केला पराभव

टोकियो ऑलिम्पिकचा चौथा दिवस हिंदुस्थानसाठी निराशाजनक होता. आज एकही पदक हिंदुस्थानच्या खात्यात येऊ शकले नाही. महिला हॉकी स्पर्धेत जर्मनीने हिंदुस्थानला 2-0 ने पराभूत केलं आहे. हिंदुस्थानचा स्पर्धेतील हा सलग दुसरा पराभव आहे.

हिंदुस्थानी संघाने चांगली सुरुवात करत पहिल्या सहा मिनिटात त्यांनी प्रतिस्पर्धी संघाच्या सर्कलमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर जर्मनीने काऊंटर हल्ला चढवत गोलचे खाते उघडले. तसेच सामन्याच्या 35व्या मिनिटाला जर्मनीच्या एने स्क्रोडरने गोल करत विजयावर शिक्कामोर्तब केला.

दरम्यान, आज सुरुवातीला तलवारबाजी आणि तिरंदाजीमध्ये हिंदुस्थानाला विजय मिळाला होता. तलवारबाजीत हिंदुस्थानच्या भवानी देवीने ट्युनिशियाच्या नादिया बेन अझीझीचा पराभव केला. मात्र पुढच्या सामन्यात ती पराभूत झाली असून भवानी देवी स्पर्धेतून बाहेर झाली आहे.

तिरंदाजीत हिंदुस्थानी पुरुष संघाने कझाकस्तानचा 6-2 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. जेथे त्यांची स्पर्धा दक्षिण कोरियाशी झाली. कोरियन संघाने हा सामना 6-0 ने जिंकत हिंदुस्थानी संघाचा पराभव केला.

आपली प्रतिक्रिया द्या