
हिंदुस्थानचा गोल्फपटू अनिर्बान लाहिरीने कारकिर्दीत दुसऱयांदा ऑलिम्पिकचे तिकीट बुक केले. याचबरोबर महिला गटात अदिती अशोक हीदेखील टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली. आंतरराष्ट्रीय गोल्फ फेडरेशनने ऑलिम्पिकसाठी 60 पुरुष खेळाडूंची यादी जाहीर केली. महिला खेळाडूंची यादी 29 जूनला जाहीर होणार आहे.
कोरोनामुळे गतवर्षी हुकली स्पर्धा
अनिर्बान लाहिरी गतवर्षी लॉकडाऊनमुळे मायदेशातच फसला होता. त्यामुळे त्याला परदेशातील काही स्पर्धांमध्ये सहभागी होता आले नाही. मात्र आता ऑलिम्पिकपूर्वी लाहिरीला दोन स्पर्धेत सहभागी होऊन आपली क्रमवारी सुधारण्याची संधी असेल. ऑलिम्पिकसाठी जाहीर केलेल्या यादीत लाहिरी 60व्या स्थानावर आहे.
उदयन माने राखीव खेळाडू
हिंदुस्थानचा गोल्फर उदयन माने याला टोकियो ऑलिम्पिकसाठी राखीव खेळाडूंच्या यादीत स्थान मिळाले आहे. एखाद्या देशाचा गोल्फर काही कारणामुळे ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाला नाही तर उदयन मानेला ऑलिम्पिकचे तिकीट मिळणार आहे.
अदिती अशोकची पात्रता पक्की
ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला अनिर्बान लाहिरी हा हिंदुस्थानचा एकमेव पुरुष गोल्फर आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये तो आणि एस.एस.पी. चौरसिया यांनी देशाचे प्रतिनिधित्व केले होते. महिला गटात अदिती अशोकचे ऑलिम्पिकचे तिकीट पक्के आहे. कारण 60 महिला खेळाडूंच्या यादीत ती 44व्या स्थानावर आहे.
‘‘ऑलिम्पिक पात्रता यादीत माझे नाव असल्याने साहजिकच आनंद झाला. ऑलिम्पिकसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करायला मिळणे ही भुषणावह बाब असते. ऑलिम्पिकमध्ये संपूर्ण काैशल्य पणाला लावण्यात कुठलीच कसर सोडणार नाही.’’ – अनिर्बान लाहिरी



























































