Tokyo olympic रवी दहियाचा वयाच्या दहाव्या वर्षापासून सराव, वडील 40 किमी दूध-फळं द्यायला यायचे

जपानमध्ये सुरू असलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानचा कुस्तीपटू रवी कुमार दहिया याने 57 किलो वजनी गटात फायनलमध्ये प्रवेश केला असून हिंदुस्थानसाठी आणखी एक मेडल पक्के केले. सेमीफायनलमध्ये रवी कुमार दहिया याने सनायेव नुरीस्लाम या कझाकिस्तानच्या प्रतिस्पर्ध्याला चितपट करत सामना जिंकला.

5 फूट 7 इंचाच्या रवी कुमार दहिया याचा जन्म हरयाणातील सोनीपत जिल्ह्यातील नहरी गावात झाला. रवीचे वडील लीजवर जमिन घेऊन शेती करत होते. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी रवी दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये सरावाला जात होता. 1982 ला आशियाई गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या सतपाल सिंह यांच्याकडून तो सराव घेऊ लागला.

रवीला एक उत्तम कुस्तीपटू बनवण्यामागे त्याच्या वडिलांचा मोठा हात आहे. आर्थिक बाजू कमकुवत असतानाही त्यांनी मुलाला चांगली ट्रेनिक देण्यात कोणतीही कुचराई केली नाही. रवीचे वडील राकेश दररोज आपल्या गावातून छत्रसाल स्टेडियमपर्यंत 40 किलोमीटरचे अंतर पार करून त्याला दूध आणि फळे द्यायला जात होते.

दरम्यान, रवीने 2019 सा वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये दमदार कामगिरी केली आणि कांस्यपदक जिंकले होते. त्यावेळी आपल्या मुलाने कांस्यपदक जिंकल्याचे रवी याचे वडील राकेश यांच्या गावीही नव्हते. रवीचा सामना सुरू असताना ते आपले काम करत होते.

#Tokyo Olympic – गेल्या जन्माचं पाप… पहिल्या प्रतिक्रियेवेळी लव्हलिना बोर्गोहेननं बोलून दाखवली व्यथा

दुखापतींनी घेरले

2015 ला झालेल्या ज्यूनिअर वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये रवीने 55 किलो वजनी गटामध्ये फायनल गाठली होती. मात्र सेमीफायनल लढतीदरम्यान त्याला गंभीर दुखापत झाली आणि तो अंतिम सामना खेळू शकला नाही. त्यामुळे त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. दुखापतीमुळे त्याला बराच काळ मॅटपासून दूर रहावे लागले. मात्र 2018 ला अंडर 23 रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये 57 किलो वजनी गटात रवीने रौप्यपदक जिंकून कमबॅक केले. तसेच कोरोनापूर्वी दिल्लीत झालेल्या आशियाई रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये रवीने सुवर्णपदक जिंकले होते.

आपली प्रतिक्रिया द्या