
ऑलिम्पिकनंतर आता टोकियोमध्ये पॅरालिम्पिक स्पर्धेचा थरार रंगणार आहे. हिंदुस्थानच्या नीरज चोप्राने भालाफेकीत सुवर्ण पदक जिंकून इतिहास घडवला. मात्र देवेंद्र झाझरियाने 2004च्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भालाफेकीत सुवर्ण पदक जिंकून 17 वर्षांपूर्वीच ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे. 2016च्या रियो पॅरालिम्पिक स्पर्धेतही त्याने सुवर्ण पदक जिंकले होते. आता टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत तिसऱयांदा विश्वविक्रमासह सुवर्ण पदक जिंकण्याच्या इराद्याने देवेंद्र झाझरिया मैदानावर उतरणार आहे.
राजस्थानमधील चुरू जिल्हय़ातील देवेंद्र झाझरियाने शिकून मोठे व्हावे, अशी आई-वडिलांची इच्छा होती. मात्र वयाच्या आठव्या वर्षी झाडावर फळ तोडत असताना देवेंद्र झाझरियाचा हात विजेच्या तारेला लागला. त्या घटनेत त्याचा एक हात कापावा लागला. मात्र एक हात गमावल्यानंतरही देवेंद्रने भालाफेक खेळात कारकीर्द घडविली. लाकडी भाल्याने सराव करणाऱया देवेंद्रने 1995मध्ये पॅराअॅथलेटिक्स स्पर्धेत सहभाग घेतला. त्या वेळी ‘द्रोणाचार्य पुरस्कार’ विजेते प्रशिक्षक आर.डी. सिंह यांची नजर देवेंद्र झाझरियावर पडली अन् त्यांनी त्याला भालाफेकीचे व्यावसायिक प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली.
दोन ऑलिम्पिकमध्ये विश्वविक्रम
देवेंद्र झाझरिया पॅरालिम्पिक स्पर्धेत दोन सुवर्ण पदके जिंकणारा हिंदुस्थानचा एकमेव खेळाडू होय. त्याने 2004च्या अथेन्स पॅरालिम्पिकमध्ये 62.15 मीटर भाला फेकून नव्या विश्वविक्रमासह सुवर्ण पदकाला गवसणी घातली होती. त्यानंतर 2016च्या रियो ऑलिम्पिकमध्ये स्वतःचाच विश्वविक्रम मोडताना देवेंद्र झाझरियाने 63.97 मीटर भाला फेकून नवा विश्वविक्रम प्रस्तापित केला. दोन विश्वविक्रमासह दोन सुवर्ण पदके जिंकण्याचा पराक्रम देवेंद्र झाझरियाच्या नावावर आहे. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित होणारा झाझरिया हा पहिलाच पॅरालिम्पियन अॅथलीट होय. आता टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत तिसऱया सुवर्ण पदकाला गवसणी घालण्याचे देवेंद्र झाझरियाचे लक्ष्य आहे.




























































