
महामार्गावरील टोल आम्ही नाकारत नाही पण जिल्ह्यांतर्गत प्रवासासाठी कोणत्याही परिस्थीत टोल आम्ही भरणार नाही ही आमची भूमिका आहे. सिंधुदुर्ग पासिंगच्या गाड्यांना टोलमाफी नव्हे तर टोल मुक्ती मिळालीच पाहिजे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गाच्या भूमिपूजन सोहळयात सिंधुदुर्गवासियांना टोलचा भुर्दंड पडणार नाही असे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले? आता बुधवार पासून टोल वसूलीचा घाट घातला जात असून कोणत्याही परिस्थितीत सिंधुदुर्ग पासिंगच्या वाहनांकडून टोलवसूली आम्ही करू देणार नाही. त्यासाठी बुधवार 14 जून रोजी सकाळी 10 वा. ओसरगाव टोलनाका येथे सर्व जिल्हावासिय आणि सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकत्र यावे, त्याठिकाणी सनदशीर मार्गाने आंदोलन करणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा टोलमुक्त संघर्ष समितीच्या पदाधिकार्यांनी कणकवलीत पत्रकार परिषदेत दिली.
कणकवली येथील एमएच-07 हॉटेलमध्ये मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी समितीचे अध्यक्ष द्वारकानाथ घुर्ये, जिल्हा व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर तसेच समिती सदस्य नंदन वेंगुर्लेकर, नितीन वाळके, संजय भोगटे, दिपक बेलवलकर, नितीन म्हापणकर, बाळू मेस्त्री, मठकर, दादा कुडतरकर, अनंत पिळणकर, कन्हैया पारकर, प्रमोद मसुरकर, विलास कोरगावकर आदींसह समिती सदस्य उपस्थित होते. नितीन वाळके म्हणाले 1 जानेवारीपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्रव्यवहार केला. खा. विनायक राऊत यांनीही ना. गडकरी यांचे सिंधुदुर्ग पासिंगच्या वाहनांना टोल मुक्तीबाबत लक्ष वेधले होते. आता महामार्ग प्राधिकरणने टोल वसुलीची तारीख निश्चित केली आहे, मात्र जिल्ह्यातील वाहनांकडून टोल वसुलीला आमचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे आता आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचे नितीन वाळके यांनी सांगितले. द्वारकानाथ घुर्ये यांनीही टोल विरोधात आक्रमक पवित्रा घेणार असल्याचा इशारा दिला.
नंदन वेंगुर्लेकर यांनी राज्यात अनेक ठिकाणी स्थानिक लोकांची गैरसोय लक्षात घेवून टोल माफी झाली असल्याचे सांगितले. त्यामुळे सिंधुदुर्गवासिंयाना टोल माफी मिळालीच पाहिजे अन्यथा टोल नाका उचलून खारेपाटण किंवा बांदा येथे न्यावा. सिंधुदुर्गातील वाहनांचे आरटीओने रेकॉर्ड तपासून पास द्यावा. टोल नाक्यावरील 8 लेनपैकी एमएच-07 पासिंगच्या वाहनांना स्वतंत्र लेन ठेवावी. गोव्यात नागरिकांना टोलमधून सूट मिळते तर सिंधुदुर्गात का नाही. भाजपची सत्ता केंद्रात आणि महाराष्ट्रात असताना सिंधुदुर्गावर अन्याय का? असा सवाल वेंगुर्लेकर यांनी केला. यानंतर टोल मुक्ती संघर्ष समितीच्या पदाधिकार्यांची बैठक झाली. या बैठकीत बुधवारच्या आंदोलनाची रणनिती ठरवण्यात आली.



























































