
सध्या सामान्य माणसाला टोमॅटोने रडवलं आहे. अनेक ठिकाणी 200 रुपये किलोपर्यंत टोमॅटो विकले जात आहेत. पण, सध्या टोमॅटोचे दर कमी होण्याची चिन्हं नाहीत. कारण, येत्या काही दिवसांत 300 रुपये किलोपर्यंत टोमॅटोचे दर जाऊ शकतात, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
नॅशनल कमोडिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेडचे प्रमुख कार्यकारी अधिकारी संजय गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, टोमॅटोचे दर आणखी वाढू शकतात. येत्या दोन महिन्यांत ग्राहकांना दिलासा मिळण्याची चिन्हं नाहीत, असं गुप्ता यांनी स्पष्ट केलं आहे.
देशात अनेक भागात आलेल्या प्रचंड पावसामुळे टोमॅटोच्या किमतीत वाढ झाली आहे. टोमॅटोचे दर नेहमीच्या तुलनेने 300 टक्क्यापर्यंत वाढले आहेत. सततच्या पावसामुळे शेतीच्या उत्पादनावरही परिणाम होणार आहे. त्यात किमतीत घट होण्याची चिन्ह नाहीत.
टोमॅटोचं 91 टक्के उत्पादन महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, ओडिशा, बिहार, छत्तीसगढ, तेलंगणा, उत्तर प्रदेश, तमिळनाडू आणि हरयाणा येथे होतं. त्यात महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांत विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने टोमॅटोचं पीक नष्ट झालं आहे.


























































