सरकारी बँका गाळात, ८७ हजार कोटींचा तोटा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बुडीत कर्जामुळे देशभरातील २१पैकी १९ सार्वजनिक बँका तोटय़ाच्या गाळात रुतल्या आहेत. २०१७-१८ या आर्थिक वर्षात या बँकांना थोडा थोडका नव्हे तर तब्बल ८७ हजार २५७ कोटींचा तोटा झाला आहे. इंडियन बँक आणि विजया बँक मात्र या तोटय़ाच्या गर्तेत सापडलेली नाही.

गाळातून बाहेर पडणार कसे?

११ बँकांची स्थिती तर अत्यंत वाईट असून त्यांनी वेळीच आर्थिक सुधारणा करावी, असे आदेशच रिझर्व्ह बँकेने दिले आहेत.

हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी ‘पीएनबी’चे मानद संचालक सुनील मेहता यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली आहे.

मेहता समिती दोन आठवडय़ांत आर्थिक पुनर्रचना कंपनीची स्थापना करून त्याद्वारे आर्थिक सुधारणेच्या शिफारशी सरकारला करेल.

२०१७मध्ये पीएनबी १३२४ कोटींच्या नफ्यात होती. यंदा मात्र नीरव मोदी प्रकरणामुळे बँकेला १२ हजार ३८२ कोटींचा तोटा झाला आहे. पीएनबीपाठोपाठ आयडीबीआय (८२३७ कोटी) आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (६५४७ कोटी) चा क्रमांक लागतो.

इंडियन बँकेला मात्र १२५८.९९ कोटींचा तर विजया बँकेला ७२७.०२ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. देशातील या १९ सार्वजनिक बँका तब्बल ८.३१ लाख कोटींच्या थकीत कर्जामुळे अडचणीत आल्याची रिझर्व्ह बँकेची आकडेवारी सांगते.