
सिंधुदुर्गाची पर्यटन राजधानी अशी ओळख असलेले मालवण (तारकर्ली-देवबाग) यावर्षी पर्यटन हंगामाच्या सुरवातीलाच संकटात सापडले आहे. अरबी समुद्रात घोंगावणाऱ्या ‘क्यार’ चक्रीवादळाच्या तडाख्यात पर्यटन हंगामाची सुरवातच वाहून गेली आहे. पर्यटन ठप्प झाल्याने येथील पर्यटन व्यवसाईक आर्थिक अडचणीत सापडला आहे. पर्यटकांनी केलेले आगाऊ बुकिंग रद्द केले आहे. त्यामुळे ऐन हंगामात पर्यटन ठप्प झाले आहे. आता वादळाचा प्रभाव पूर्ण कमी होऊन खवळलेला समुद्र शांत होण्याची वाट पर्यटन व्यवसाईक पाहत आहेत.
जिल्ह्याच्या सागरी पर्यटनाचे केंद्र म्हणून मालवणकडे (तारकर्ली-देवबाग) पाहिले जाते. येथे दरवर्षी लाखो पर्यटक येतात. यात देशी तसेच विदेशी पर्यटकही असतात. पावसानंतर सुरू होणारा पर्यटन हंगाम मे अखेर पर्यंत असतो. मात्र पर्यटन हंगामाची सुरुवात दिवाळीपासून होते. त्याच्या सुरवातीला यावर्षी समुद्रात वादळ घोंगावले. समुद्र खवळून निघाला आहे. समुद्रात व खाडी पात्रात असलेल्या पर्यटन व्यवसाईक यांच्या वॉटर स्पोर्ट्स, पॅरासेलिंग, बोटी पुन्हा किनाऱ्यावर आणण्यात आल्या आहेत. पर्यटकांच्या स्वागतास सजवून ठेवलेल्या रूममध्ये पाणी घुसले. हॉटेलबाहेर उभारलेले तात्पुरत्या स्वरूपातील तंबू कोसळले. परिसरात झाडे पडून नुकसान झाले. वीज खांब पडून बत्तीगुल झाली. वादळ आता ओसरले असले तरी वाऱ्यांचा वेग कायम आहे. समुद्रही अशांत असल्याने सर्व स्थिती पूर्वपदावर येण्यास आणखी काही दिवसांचा कालावधी जाईल. हॉटेल परिसरात पाण्यासोबत आलेली, माती, दगड व अन्य स्वरूपात झालेली अस्वच्छता अन्य नुकसान यांची डागडुजी व स्वच्छता यासाठी काही दिवस जाणार आहेत. त्यामुळे पूर्ण दिवाळी पर्यटन हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही व्यवसाईक येथील हॉटेल चालवण्यासाठी कराराने घेतात. त्यात मोठी गुंतवणूक असते त्यांचेही नुकसान झाले आहे.
काही पर्यटक यांनी आगाऊ पैसे भरून बुकिंग केले त्यातील काही किरकोळ पर्यटक आले आहेत. मात्र स्कुबा ड्रायविंग, वॉटर स्पोर्ट्स बंद आहेत. तर मासेमारी ठप्प असल्याने मासेही मिळत नाही. त्यामुळे आलेला पर्यटक माघारी परतत आहे. पर्यटक अरबी समुद्रातील ऐतिहासिक ठेवा असलेल्या किल्ले सिंधुदुर्ग दर्शनासाठी येतात. दिवाळी हंगामात हजारो पर्यटक किल्ले दर्शनास येतात. मात्र समुद्री वादळामुळे किल्ले दर्शन बंद आहे. प्रवासी होड्या बंद असून किनाऱ्यावर आहेत. त्यामुळे किल्ले दर्शन बंद आहे. मालवण, तारकर्ली-देवबाग येथे अनेक हॉटेल ऑनलाईन स्वरूपात आगाऊ बुक केली जातात. काही रक्कम हॉटेल मालकांच्या बँक खात्यात जमा करत बुकिंग केले जाते. मात्र 25 ऑक्टोबरपासून असलेले अनेक हॉटेलचे बुकिंग रद्द झाले आहे. तर नव्याने बुकिंग घेताना सध्याची अशांत समुद्री स्थिती सांगून सध्यास्थितीत 2 दिवस बुकिंग घेतली जात नसल्याचे स्थिती आहे, अशी माहिती मालवणचे नगराध्यक्ष तथा मालवण चिवला बीच येथील पर्यटन व्यवसाईक महेश कांदळगावकर यांनी दिली.

























































