
मार्गशीर्ष एकादशी, नाताळ उत्सव, दत्त जयंती या सणांसह जोडून शनिवार व रविवार आल्यामुळे सलग सुट्टय़ा मिळालेल्या आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील शिर्डी, शनिशिंगणापूर, महाबळेश्वर, कोल्हापूर, पंढरपूरसह अक्कलकोटमध्ये गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटनस्थळांसह धार्मिक स्थळांवरील हॉटेल, रिसॉर्ट, बंगले, धर्मशाळांचे बुकिंग अगोदरच फुल्ल झाले आहे.
महाराष्ट्राचे मिनी कश्मीर असलेल्या महाबळेश्वरमध्ये सध्या सुट्टय़ा आणि ‘थर्टी फर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. सध्या हॉर्स रायडिंग, बोटिंग, वासोटा किल्ला ट्रेकिंग यासाठी महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची पावले वळली आहेत. यासाठी सातारा जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.
पंढरपुरात आज दोन लाख भाविकांची उपस्थिती असून, मार्गशीर्ष महिन्यातील भागवत एकादशीला आलेल्या भाविकांनी चंद्रभागा स्नान, मुखदर्शन व पदस्पर्श दर्शन घेण्यास प्राधान्य देत आहेत. मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, स्टेशन रोड, प्रदक्षिणा मार्ग, भक्तिमार्ग भाविकांनी फुलून गेला होता. मार्गशीर्ष महिन्यात विठ्ठल विष्णुपद येथे दर्शनाला महत्त्व असल्यामुळे गोपाळपूर येथे भाविकांची गर्दी आहे.
पंढपूरला आलेले भाविक मोठय़ा संख्येने अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला जात असतात. मार्गशीर्ष महिना आणि दत्त जयंतीमुळे अक्कलकोटमध्ये भाविकांची उपस्थिती दिसून येत आहे. सध्या अक्कलकोटमध्ये आलेल्या भाविकांमुळे वाहनांची प्रचंड कोंडी होत आहे. प्रशासन चोवीस तास भाविकांना सोय उपलब्ध व्हावी, यासाठी प्रयत्न करीत आहे.
सलग आलेल्या सुट्टय़ांमुळे राज्यातील कानाकोपऱयातून भाविकांचा शनिदर्शनासाठी ओघ वाढला आहे. राहुरी, सोनई, मुळा फक्ट्री, शनिशिंगणापूर परिसर वाहनांनी सर्वत्र चक्काजाम झाल्याने सर्व पार्ंकग स्थळे हाऊसफुल्ल होऊन रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सध्या शाळांच्या सहली चालू असल्यामुळे अनेक सहलीही या ठिकाणी दाखल झाल्या आहेत. नव्याने दर्शनपथ पूर्ण होत असल्यामुळे तेथे सेल्फी, फोटो काढण्याचा आनंद घेताना भाविक दिसत आहेत.
अवघ्या जगाला श्रद्धा व सबुरीचा संदेश देणाऱया साईंच्या शिर्डीलासुद्धा आज सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. सलग आलेल्या सुट्टय़ांमुळे पुढचे काही दिवस शिर्डीत अशीच गर्दी राहणार आहे. सकाळपासूनच साईनामाच्या जयघोषाने शिर्डीतील रस्ते दुमदुमून गेले आहेत. दरवर्षी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठीही शिर्डीत मोठी गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर साईबाबा संस्थानने भाविकांच्या दर्शनाची विशेष व्यवस्था केली असून, नवीन वातानुकूलित दर्शन रांगेतून साईबाबांना सुकर दर्शन कसे घेता येईल, याची विशेष काळजी घेतली जात आहे.
कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात मार्गशीर्ष महिन्यामुळे भाविकांची गर्दी असून, विशेष करून महिलांची उपस्थिती जास्त आहे. तर जिह्यातील जोतिबा डोंगरासह पन्हाळ्यावर पर्यटकांची तुफान गर्दी होत आहे. दत्त जयंतीसाठी नृसिंहवाडी सज्ज झाली असून, या ठिकाणी सांगली, कोल्हापूरसह कर्नाटकमधून मोठय़ा संख्येने भाविक दर्शनासाठी येत आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासनासह पोलीस यंत्रणा सतर्क आहे.


























































