
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील नळणी येथे गुरुवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टर उलटून अपघात झाला. या अपघातात सुरज अजबसिंग सिंघल ( वय 19) हा एकुलत्या एक तरुण मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.
नळणी बुद्रुक येथील सुरज सिंघल हा गुरुवारी सकाळी 8 वाजता त्याच्या नळणी परिसरातील शेतात गेला होता. तेथे ट्रॅक्टरद्वारे पराठी उपटण्याचे काम सुरू होते. ट्रॅक्टर चालकाला शेताजवळ असलेल्या नाल्याचा अंदाज न आल्याने ट्रॅक्टरचा अचानक तोल जाऊन ट्रॅक्टर दोनवेळा उलटून नाल्यात कोसळला. या घटनेत नाल्याच्या बाजूला थांबलेला सुरज हा ट्रॅक्टर खाली दबला गेला. परिसरातील शेतकऱ्यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी सूरजला तात्काळ भोकरदन येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी भोकरदन पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला असून घटनेनंतर ट्रॅक्टर चालक हा फरार झाल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दुपारी उत्तरीय तपासणी केल्यानंतर सायंकाळी चार वाजता सुरज याच्यावर नळणी बुद्रुक येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी आईला एकुलता एक आधार असलेला सुरज अपघातात मृत्यू झाला आहे.



























































