
सामना प्रतिनिधी । मेहकर
मेहकर शहरात शिवसेना व युवासेनेच्या वतीने ट्रॅक्टर पोळा साजरा झाला. यावर्षीचे हे तिसरे वर्ष आहे. दिवसेंदिवस आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतीची कामे ट्रॅक्टरने केली जात आहेत. बैलांची संख्या कमी होत असून झटपट कामासाठी शेतकरी ट्रॅक्टरचाच वापर करतांना दिसतो. त्यामुळेच गेल्या तिन वर्षांपासून शहरात शिवसेना व युवासेना ट्रॅक्टर पोळा साजरा करीत आहे.
सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृहापासून सजवलेल्या 30 ट्रॅक्टर्सची वाजत गाजत शहरातून मिरवणुक काढण्यात आली. या मिरवणुकीचा बाजार समितीमध्ये समारोप झाला. शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांनी ट्रॅक्टरची पुजा करून व काही वेळ ट्रॅक्टर चालवून मिरवणुकीला सुरूवात झाली. मिरवणुकीत युवासेनेचे जिल्हा युवाधिकारी ऋषी जाधव, तालुकाप्रमुख सुरेश वाळूकर, शहरप्रमुख तथा न प उपाध्यक्ष जयचंद बाठीया, निरज रायमुलकर, भुषण घोडे, ट्रॅक्टर विक्रेते किशोर गारोळे, नगरसेवक व पदाधिकारी शिवसैनिक सहभागी झाले होते. बाजार समितीत सभापती माधवराव जाधव. उपसभापती बबनराव तुपे व संचालकांनी ट्रॅक्टर मालक व चालकांचा सत्कार केला.






























































