
राजकुमार भगत, न्हावाशेवा
रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे गव्हाणफाट्याच्या चार मार्गावर शुक्रवारी प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. गव्हाणफाटा-चिरनेर, गव्हाणफाटा- पनवेल, गव्हाणफाटा – नवीमुंबई, आणि गव्हाणफाटा-जेएनपीटी या चारही रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांबा लागल्या होत्या. या वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे चाकरमान्यांचा मात्र विनाकारण खोळंबा झाला.
गव्हाणफाटा-पनवेल मार्गावर पाडेघर येथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्यामुळे ही वाहतूक कोंडी झाली असल्याचे गव्हाणफाटा वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गुंजाळ यांनी सांगितले. तर उरण वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद भोसले यांच्याकडे विचारणा केली असता त्यांना या वाहतूक कोंडीबाबत माहिती नसल्याचे सांगितले व तो भाग आमच्या हद्दीत येत नसल्याचे सांगितले.
पावसाळा सुरू झाल्यापासून मागील कित्येक दिवसांपासून गव्हाणफाटा जवळ होणाऱ्या ट्राफिक जाम मुळे प्रवाशांना आणि वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. संध्याकाळी कामावरून परत येणाऱ्या चाकरमान्यांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. दिवसभर काम करून थकलेल्या या चाकरमान्यांना घरी परतताना ट्राफिक जामचा मनस्ताप सहन करावा लागतो. अर्ध्या तासाच्या प्रवासाला येथे रोज दोन अडीच तास लागत असल्याने या मार्गावरील प्रवास नकोसा वाटू लागला आहे.
उरण भागात संध्या कंटेनर यार्ड आणि गोदामांचे पेव फुटले असल्याने ठिकठिकाणी रस्त्यांच्या बाजूला असे कंटेनर यार्ड निर्माण झाले आहेत. या कंटेनर यार्डमध्ये कंटेनर भरण्यासाठी किंवा खाली करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कंटेनर ट्रेलरसारखी हजारो अवजड वाहने या मार्गावरून धावत असतात. गव्हाणफाटा परिसरात सगळ्या मार्गांवर रस्ते रुंदीकरण तसेच दुरुस्तीची कामे सूरू असल्यामुळे देखील ही वाहतूक कोंडी होत आहे. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी गव्हाणफाटा वाहतूक पोलीस, पनवेल वाहतूक पोलीस हे भरपावसामध्ये प्रयत्न करत होते. तर उरण वाहतूक शाखेचे पोलीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तरी पावत्या फाडण्यात मग्न होते. सतत पडणाऱ्या पावसामुळे आणि मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या असल्यामुळे ही वाहतूक कोंडीच्या रांगा आणखी लांब वाढत होत्या आणि वाहतूक कोंडीत भर पडत होती.


























































