
सामना प्रतिनिधी, मुंबई
अपघाताचे प्रकार कमी करण्यासोबतच सुरळीत वाहतुकीकरता आवश्यक असलेली अद्ययावत उपकरणे महामार्ग पोलीस रस्ते सुरक्षा निधीतून खरेदी करणार आहेत. बॉडी कॅमेरा, स्पीड रडार गनपासून ते रस्ता सुरक्षा जनजागृती वाहनाचा त्यात समावेश आहे. 100 कोटी रुपयांच्या उपकरण खरेदीचा प्रस्ताव तयार केला आहे.
हिंदुस्थानात रेल्वे अपघातानंतर वाहन अपघातात मृत्यू होण्याची संख्या अधिक आहे. अपघाताच्या वाढत्या प्रकारांची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱयांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. राज्य, राष्ट्रीय आणि एक्स्प्रेस वेवर वाहन चालकावर कारवाई करताना पोलिसांना अडचणी येतात. उपलब्ध असलेल्या मनुष्यबळात कारवाईदरम्यान पोलिसांना कोणत्या प्रकारची उपकरणे आवश्यक आहेत याचा नुकताच आढावा घेण्यात आला. उपकरण खरेदी करता ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंटने (बीपीआरडी) मानांकन निश्चित केली. त्यानुसार अद्ययावत उपकरण खरेदी करण्यात येणार आहेत.
वाहतूक पोलिसांकरिता लागणारी उपकरणे रस्ते सुरक्षा निधीतून खरेदी केली जाणार आहेत. उपकरणाची टप्प्याटप्प्याने खरेदी केली जाईल. अद्ययावत सामुग्री आल्यामुळे अपघाताचे प्रकार कमी होतील. तसेच चांगल्या प्रकारे अंमलबजावणी होईल.
-विजय पाटील, पोलीस उपायुक्त (मुख्यालय), महामार्ग पोलीस
बॉडी कॅमेऱ्यामुळे पोलिसांसोबत हुज्जत घालण्याचे प्रकार कमी होतील.
2018मध्ये राज्यात 11 हजार 929 अतिगंभीर अपघात 13 हजार 085 जणांचा मृत्यू
आकडेवारी
वर्ष अतिगंभीर अपघात मृत्यू
2016 11,780 12935
2017 11,454 12,511
2018 11,929 13,085
कोणती उपकरणे खरेदी होणार
कारवाईदरम्यान चालकासोबत होणारे वाद रोखण्याकरता पोलीस आता बॉडी कॅमेऱयाचा वापर करणार आहेत. नव्या प्रस्तावानुसार 1255 बॉडी कॅमेरे खरेदी केले जाणार आहेत. तर 502 ब्रिथ अनालायझर मशीन, 251 कार डॅश बोर्ड, 1500 स्मार्ट फोन, 171 इंटरसेप्डेड गाडय़ा, 155 स्पीड रडार गँस, 251 टोईंग रिकव्हरी व्हेईकल, 7530 बॅरिकेड्स, 2510 एलईडी ब्याटन, 12550 मीटर रोप खरेदी केली जाणार आहे. तर रस्ते सुरक्षा जनजागृतीकरता 71 गाडय़ा खरेदी केल्या जाणार आहेत. त्या गाडय़ांमध्ये रस्ते सुरक्षा, अपघात कसे रोखले जावेत याची माहिती जिल्हा पोलीस स्थानिक रहिवासी, महाविद्यालयीन युवकांना देणार आहेत.


























































