नगर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया आली अंतिम टप्प्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या जवळपास अंतिम टप्प्यात आहेत. शेवटचा असणाऱया संवर्ग चारमधील अवघड क्षेत्रातील 46 शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया होणे बाकी आहे. येत्या आठ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. दरम्यान, आतापर्यंत संवर्ग एक, दोन आणि तीन तर संवर्ग चारमधील तिसऱया टप्प्यापर्यंत एकूण 1 हजार 735 शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. येत्या 8 दिवसांत संवर्ग चारमधील शेवटच्या टप्प्यातील अवघड क्षेत्रातील 46 शिक्षकांच्या बदल्या झाल्यावर एकूण 1 हजार 781 शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

कोविड संसर्गाची दोन वर्षे आणि तिसरे वर्षे ऑनलाईन बदलीच्या प्रक्रियेत रखडल्यानंतर नोव्हेंबर 2022 पासून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदलीच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. महिनाभरापूर्वी संवर्ग एक ते तीनमधील बदली पात्र 662 गुरुजींच्या बदल्या झालेल्या होत्या. त्यानंतर संवर्ग चारमधील पहिल्या टप्प्यात एकल असणाऱया 1 हजार 34 शिक्षकांच्या आणि बदलीची प्रक्रिया झाली. यामुळे आतापर्यंत बदली झालेल्या शिक्षकांची संख्या 1 हजार 735 पर्यंत पोहोचली असून, गेल्या तीन वर्षांपासून गुरुजी बदलीच्या प्रतीक्षेत होते. यंदा शिक्षकांच्या बदल्यांना मुहूर्त लागला आहे. आता संवर्ग चारमधील शेवटच्या अवघड क्षेत्रातील रिक्त जागांवर शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया होणार आहे. या ठिकाणी 46 जागा रिक्त असून, या जागा भरल्यानंतर शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

अवघड क्षेत्रातील 46 जागा रिक्त असून, या ठिकाणी बदलीपात्र शिक्षकांची यादी आज सकाळी प्रसिद्ध होणार आहे. ती प्रसिद्ध झाल्यानंतर अवघड क्षेत्रात बदलीसाठी पात्र असणाऱयांना पसंतीक्रमाने शाळा भराव्या लागणार असून, शिक्षकांकडून भरण्यात येणाऱया जागा प्राधान्यक्रमाने ऑनलाईनने संगणकाद्वारे निवड करून या ठिकाणी शिक्षकांना नेमणुका देण्यात येणार आहेत. ही प्रक्रिया झाल्यानंतर यंदाच्या गुरुजींच्या बदल्यांचे दिव्य पार पडणार आहे.

बदली झालेल्या शिक्षकांना मे महिन्यात कार्यमुक्त करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास विभागाकडून सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात याबाबत अद्याप कोणतेच आदेश निघालेले नाहीत. मात्र, हे शैक्षणिक वर्ष संपून त्यानंतर विद्यार्थ्यांचा निकाल लागल्यानंतर पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी बदलीपात्र शिक्षकांना त्यांना नेमणुकीच्या ठिकाणी हजर होण्याची शक्यता आहे.