बदल्या झाल्यानंतरही दोन अप्पर पोलीस अधीक्षक आणि तीन पोलीस उपअधीक्षक हजरच नाहीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
maharashtra-police2

सामना प्रतिनिधी । नांदेड

महाराष्ट्र शासनाने तीन अप्पर पोलीस अधीक्षक आणि १५ पोलीस उपअधीक्षक यांच्या बदलीचे आदेश नवीन वर्षात जारी केले आहेत. ज्यामध्ये दोन अप्पर पोलीस अधीक्षक आणि तीन पोलीस उपअधीक्षक यांच्या बदल्या झाल्यानंतर सुद्धा ते नवीन ठिकाणी हजर झाले नव्हते. त्यात भोकर येथे येणारे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश गावडे यांचाही समावेश आहे. नांदेडमध्ये नागरी हक्क संरक्षण विभागाला पोलीस अधीक्षक देण्यात आला आहे.

राज्य शासनाच्या गृह विभागाचे सचिव कैलाश गायकवाड यांनी ३ जानेवारी रोजी जारी केलेल्या आदेशानुसार नांदेड येथे भोकर अप्पर पोलीस अधीक्षक या पदावर बदली झालेले गणेश गावडे यांना अप्पर पोलीस अधीक्षक संभाजीनगर ग्रामीण हे पद देण्यात आले आहे. तसेच उपायुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग संभाजीनगर येथे बदली झालेल्या अप्पर पोलीस अधीक्षक अप्पर्णा सुधाकर गिते यांना पोलीस अधीक्षक नागरी हक्क संरक्षण विभाग, नांदेड या पदावर पाठविण्यात आले आहे. संभाजीनगर ग्रामीण येथील अप्पर पोलीस अधीक्षक उज्ज्वला बनकर यांना उपायुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग संभाजीनगर येथे पदस्थापना देण्यात आली आहे.

सोबतच बदली आदेशाधीन असलेले पोलीस उपअधीक्षक राहूल मदने यांची बदली संगमनेर उपविभागात झाली होती, पण आता त्यांना श्रीरामपूर उपविभाग जिल्हा नगर येथे पाठविण्यात आले आहे. अशोक थोरात हे शिर्डी उपविभाग येथे कार्यरत होते त्यांना उपविभाग संगमनेर जि. नगर येथे पाठविण्यात आले आहे. पोलीस उपअधीक्षक श्रीपाद काळे यांची बदली पोलीस उपअधीक्षक अकोला या पदावर आदेशीत झाली होती, पण आता त्यांना पोलीस उपअधीक्षक नागरी हक्क संरक्षण मुंबई येथे पाठविण्यात आले आहे. प्रविण काळे हे अमरावती येथील नागरी हक्क संरक्षण विभाग येथे कार्यरत होते, त्यांना उपविभागीय पोलीस अधिकारी बोईसर जि. पालघर येथे पाठविण्यात आले आहे. बृन्हमुंबई येथील सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुरलीधर चव्हाण यांना सहायक पोलीस आयुक्त नवी मुंबई येथे पाठविण्यात आले आहे. इस्मामपूर जि. सांगली येथील पोलीस उपअधीक्षक किशोर काळे यांना कोल्हापूर जिल्ह्याच्या जयसिंगपूर उपविभागात पाठविण्यात आले आहे. जयसिंगपूरचे कृष्णांत पिंगळे यांना इस्लामपूर उपविभागात पाठविण्यात आले आहे. सुनील सहदेव गावकर हे राज्य गुप्त वार्ता विभाग मुंबई येथे अप्पर उपायुक्त पदावर कार्यरत होते त्यांना मुंबई शहरात सहायक पोलीस आयुक्त पदावर पाठविले आहे. पोलीस अधीक्षक राज्य महामार्ग नागपूर येथील उपअधीक्षक राजीव मुठाणे यांना पोलीस उपअधीक्षक एम.आय.ए.पुणे येथे पाठविले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस उपअधीक्षक मुख्यालयचे विजय खैरे यांना पोलीस उपअधीक्षक सायबर सुरक्षा मुंबई या कार्यालयात पाठविले आहे. संजय सांगळे हे आर्थिक गुन्हे शाखा जळगाव येथे पोलीस उपअधीक्षक होते त्यांना अप्पर उपआयुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग येथे पाठविले आहे. राजेंद्र धामनेरकर हे नागपूर शहरात सहायक पोलीस आयुक्त पदावर कार्यरत होते त्यांना सुद्धा अप्पर उपआयुक्त राज्य गुप्त वार्ता विभागात पाठविले आहे. पोलीस उपअधीक्षक राज्य महामार्ग ठाणेचे श्रीकांत मोहिते यांना सहायक पोलीस आयुक्त पिंपरी-चिंचवड येथे पाठविले आहे.

नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे येणारे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश गावडे हे येण्याअगोदर त्यांची बदली करण्यात आली आहे. तसेच सध्या भोकर उपविभागात कार्यरत पोलीस उपअधीक्षक अभय भास्कर देशपांडे यांना जालना जिल्ह्याच्या पोलीस उपअधीक्षक मुख्यालय या पदावर पाठविण्यात आले आहे. भोकर येथील अप्पर पोलीस अधीक्षक हे कार्यालयच अगोदर पंढरपूर येथे स्थलांतरीत करण्यात आले होते, पण पुन्हा ते रद्द झाले आणि ते गणेश गावडे यांची नियुक्ती झाली. पण आता गणेश गावडेही येणार नाहीत, त्यामुळे भोकर अप्पर पोलीस अधीक्षक पद रिकामेच राहणार आहे, तसेच कार्यरत पोलीस उपअधीक्षक देशपांडे यांचीही बदली झाली आहे आणि ती जागा सुद्धा राज्य शासनाने भरलेली नाही आणि तेही पद रिकामेच राहणार आहे.