प्रवाशांची हत्या करणारी तृतीयपंथीयांची टोळी गजाआड; नगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पैसे न दिल्याने रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांची हत्या करणाऱ्या तृतीयपंथीयांच्या नऊ जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने 12 तासांत गजाआड केले आहे. राहाता तालुक्यातील एकरुखे येथे ही घटना घडली होती. दिलीप आभाळे असे मृताचे नाव असून, पोलिसांनी विकास दशरथ धनवडे ऊर्फ रूपाली सलोनी शेख, आनंद फौजी शेलार ऊर्फ रुचिरा सलोनी शेख, लक्ष्मण शंकर वायकर ऊर्फ लक्ष्मी सलोनी शेख, अभिजित ऊर्फ गोटय़ा बाळू पवार, गौरव ऊर्फ सनी भागवत पवार, राहुल उत्तम सोनकांबळे, अरबाज सत्तार शेख यांना अटक केली असून, इरफान शेख हा फरार आहे.

दिलीप आभाळे व त्यांचे मित्र निवृत्ती क्षीरसागर हे बुधवारी (दि. 15) पेट्रोल भरण्यासाठी जात असताना गणेशनगर फाटा येथे काही तृतीयपंथीयांनी आभाळे यांना अडवून पैशांची मागणी केली. त्यावरून त्यांच्यात वाद झाला होता. याच्या रागातून तृतीयपंथीयांनी त्याच दिवशी इतर साथीदारांसह एकरुखे गावात जाऊन आभाळे व क्षीरसागर यांना लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. उपचारांदरम्यान आभाळे यांचा मृत्यू झाला. यानंतर राहाता पोलीस ठाण्यात सचिन उत्तम जाधव ऊर्फ संचिता तमन्ना पवार याच्यासह त्याच्या नऊ साथीदारांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या पथकाने पवार याला अटक केली होती. त्याने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी खंडाळा, श्रीरामपूर, नायगाव, कोल्हार आदी ठिकाणांहून इतर आरोपींना अटक केली.