दादरमध्ये झाड कोसळून चार जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई 

दादर येथे झाड कोसळून एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले. यामध्ये एका तरुणीला गंभीर दुखापत झाली आहे. जखमींवर हिंदुजा रुग्णालयात उपचार करण्यात आले. शिवसेना भवनजवळच्या स्वामी समर्थ मठाजवळ ही घटना घडली.  या घटनेमुळे मुंबईतील धोकादायक झाडांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

शनिवारी रात्रीच दहिसरमध्ये १४ वर्षीय मुलीच्या अंगावर झाड पडून तिचा मृत्यू झाला. यापूर्वी एप्रिलमध्ये दादरमध्येच झाड अंगावर पडल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तर दादरच्या घटनेत चार जखमी झाले. जखमींमध्ये अच्युत्तम राऊत (५६), ज्योती राऊत (५०), आदिती राऊत (८) यांचा समावेश आहे. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या श्रेया राऊत (२०) हिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, या घटनेतील जखमींची महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर, सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी भेट घेऊन विचारपूस केली.

झाड पडून मृत्यू झालेल्या घटना

२२ जुलै २०१७ – दूरदर्शनच्या माजी वृत्त निवेदिका कांचन रघुनाथ यांचा चेंबूर येथे मॉर्निंग वॉकला जाताना अंगावर नारळाचं झाड कोसळून मृत्यू

२३ जुलै २०१७ – किशोर पवार (वकील)- ठाण्यातल्या पाचपाखाडी परिसरात झाड कोसळून मृत्यू

७ डिसेंबर २०१७ – शारदा घोडेस्वार – डायमंड गार्डन परिसर, चेंबूरमध्ये बसस्टॉपवर झाड कोसळून मृत्यू

१९ एप्रिल २०१८– दादर पूर्व भागात दिनेश सांगळे यांचा अंगावर झाड कोसळून मृत्यू

९ जून २०१८– दहिसरमधील एस. एन. दुबे या रोडवर दृष्टी मुंगरा या मुलीचा झाड अंगावर झाड कोसळून मृत्यू