
सामना प्रतिनिधी। मुंबई
मध्य रेल्वेच्या मुलुंड स्थानकात ओव्हरहेड वायरवर झाड पडल्याने शनिवारी सकाळी प्रवाशांची लटकंती झाली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून कल्याणच्या दिशेने जाणारी गाडी स्थानकात असतानाच फलाट क्रमांक एकच्या ओव्हरहेड वायरवर झाड पडले. त्यामुळे धिम्या मार्गाची डाऊन लोकल वाहतूक सेवा विस्कळीत झाली.

धिम्या मार्गावर झालेल्या या दुर्घटनेमुळे सर्व लोकल जलद मार्गावर वळवण्यात आल्या होत्या. मात्र स्थानकात उभ्या असलेल्या लोकलच्या पेण्टोग्राफमध्ये या झाडाची फांदी अडकल्याने बराच वेळ ही गाडी स्थानकातच खोळंबली होती. त्यामुळे दुपारपर्यंत धिम्या मार्गावरील गाडय़ा सुमारे अर्धा तास उशिराने धावत होत्या. सकाळपासून पावसाने विश्रांती घेतल्याने शनिवारी तरी लटकंतीशिवाय प्रवास होईल या आशेवर बाहेर पडलेल्या प्रवाशांना लटकंतीचा सामना करावा लागला.

पडझड सुरूच
मुंबईत शनिवारी पावसाने उसंत घेतली असली तरी काही ठिकाणी जोरदार वाऱयामुळे झाडे पडण्याच्या अनेक घटना घडल्या. सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ताडदेव आरटीओजवळ रस्त्यावर झाड पडल्याने दोन टॅक्सींचे नुकसान झाले.

यामुळे या ठिकाणची वाहतून विस्कळीत झाली होती. यावेळी स्थानिक नगसेविका अरुंधती दुधवडकर यांनी या ठिकाणी तातडीने धाव घेऊन पालिका अधिकाऱयांशी संपर्क साधून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, शनिवारी मुंबईत एकूण 44 ठिकाणी झाडे कोसळली तर 9 ठिकाणी भिंतीचा भाग, स्लॅब पडले.


























































