
सामना प्रतिनिधी । अंबरनाथ
मांगरूळच्या डोंगरावर शिवसेनेने लोकसहभागातून लावलेल्या एक लाख झाडांना अज्ञात समाजकंटकांनी आग लावल्याची संतापजनक घटना घडली आहे. त्यात 70 टक्के झाडे जळून खाक झाली असून दुसऱ्यांदा असा प्रकार झाल्याने त्यामागे घातपात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. या घटनेला वनविभागच जबाबदार असून झाडे जगवण्याची जबाबदारी पार पाडता येत नसेल तर 50 कोटी झाडे कशी जगवणार, असा सवाल विचारला जात आहे.
झाडांची योग्य निगा राखली जावी यासाठी शिंदे यांनी स्वतःच्या खर्चातून पाण्याच्या टाक्या बसवल्या. तसेच पाइपलाइनचीही व्यवस्था केली होती. झाडे लावल्यानंतर वनविभागाने त्याकडे सपशेल दूर्लक्ष केले. त्याचा गैरफायदा घेत काही समाजकंटकांनी गेल्या वर्षीदेखील अशीच आग लावून असंख्य झाडे नष्ट केली. बुधवारी रात्री उशिरा मांगरुळच्या डोंगरावर लावलेल्या झाडांना पुन्हा आग लावण्यात आली. आज दुपारीदेखील समाजकंटकांनी आग लावून हजारो झाडे जळून खाक केली. आगीच्या घटनांमुळे लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे.
वनसंरक्षकांना निलंबित करा
मोठ्या मेहनतीने लोकसहभागातून लावलेल्या झाडांची निगा राखण्यास वनखात्याला सपशेल अपयश आले असून त्यास ठाण्याचे उपमुख्य वनसंरक्षक जबाबदार आहेत. या प्रकरणी त्यांना त्वरित निलंबित करा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली आहे. यासंदर्भात आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या दुर्दैवी घटनेमध्ये ७० टक्के झाडे आगीमध्ये भस्मसात झाली आहेत. समाजकंटकांनी या झाडांना आग लावण्याचे प्रकार यापूर्वीही घडले असून अश्या घटना होऊ नयेत, याची जबाबदारी वन विभागाची आहे. @MahaForest pic.twitter.com/bfsvAvcQgk
— Dr Shrikant Eknath Shinde (@DrSEShinde) November 16, 2018
कल्याण ग्रामीणमध्ये मुख्यमंत्र्यांनी केलेले वृक्षारोपण खाक
टिटवाळा – कल्याणजवळील वरप येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलेली झाडेही जळून खाक झाली आहेत. वनविभागाच्या जमिनीवरील ही झाडे असून या आगीप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली होती. तब्बल दोन हेक्टर क्षेत्रांतील जमिनीवर लावलेली झाडे नष्ट झाल्याने संताप व्यक्त होत आहे. काही व्यक्तींनी शेणी थापण्याकरिता जागा साफ करायची होती. त्यासाठी त्यांनी आग लावली. मात्र ही आग काही क्षणात पसरत गेली. त्याची धग थेट झाडांना लागल्याने अनमोल वनसंपदा नष्ट झाली. या प्रकरणी अनिल आडे, तुकाराम आडे, शुभम आडे, रामू राठोड, प्रकाश राठोड यांना अटक करण्यात आली आहे.






























































