
अभिनेते सयाजी शिंदे यांच्या पुढाकाराने बीडमधील निसर्गप्रेमी नागरिकांनी मोठ्या परिश्रमाने फुलवलेली देवराई रविवारी पहाटे अज्ञात विकृताने आग लावून जाळली. या आगीत दोन एकरवरील असंख्य झाडे जळून भस्मसात झाली. दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशामक दलालाआग विझवण्यात यश आले आहे. या घटनेने बीड शहरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
उजाड माळरान आणि अवर्षणग्रस्त बीड जिल्ह्यात सर्वाधिक वनक्षेत्र असल्यामुळे बीड जिल्ह्यात देवराईत वनराई फुलवण्याची कल्पना मांडण्यात आली. अभिनेते सयाजी शिंदे यांच्या पुढाकाराने शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर पालवणजवळील डोंगरमाथ्यावर जनतेच्या सहकार्याने चार वर्षांपूर्वी झाडे लावण्यात आली. चार वर्षे ही झाडे नागरिकांनी जोपासली. लॉकडाऊनच्या काळातही देवराईकडे विशेष लक्ष देण्यात आले. कामाच्या दगदगीतून निवांत क्षण घालवण्यासाठी हे ठिकाण नावारूपाला आले. पर्यटकांचीही मोठी गर्दी होत होती.
पहाटेपासूनच शहरातील नागरिक थेट देवराईपर्यंत पायी येत होते. हीच फुललेली देवराई अज्ञात विकृतांनी आग लावत भस्मसात केली आहे. रविवारी सकाळी अज्ञात व्यक्तींनी देवराईतील दोन एकरवरील पिंपळ, वड, लिंब अशी झाडे जाळून टाकली. दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशामक दलाला आग विझवण्यात यश आले. या दुर्घटनेने निसर्गप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे.
अत्यंत दुर्देवी घटना -अभिनेते सयाजी शिंदे
बीड येथील मोठ्या कष्टाने फुलवलेली देवराईमधील दोन एकरवरील झाडे जळाल्याची घटना समजली. अत्यंत दु:ख आणि वेदना झाल्या. ही झाडे नैर्सिगकरित्या जळाली नाहीत एवढेच आपण सांगू शकतो. पोलीस प्रशासन तपास करतील आणि दोषींवर कारवाई करतील, अशी आशा आहे.
























































