शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप हे तीन प्रमुख पक्षच रिंगणात: इतरांचे अस्तित्व शून्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कर्जत

कर्जत नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने काही राजकीय पक्षांची कोंडी झालेली दिसून येत आहे. रायगड जिल्ह्यातील महत्वाचा पक्ष असलेला शेतकरी कामगार पक्ष आपले अस्तित्व टिकविण्यासाठी प्रयत्न करतांना दिसत आहे. तर राष्ट्रीय पक्ष असलेला काँग्रेस पक्ष कर्जत निवडणुकीत दिसेनासा झाला आहे. मनसे हा पक्ष राष्ट्रवादीचा भाग बनला असून भारिप बहुजन महासंघ एका प्रभागात आपले नशीब अजमावत आहे. राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप हे तीन प्रमुख पक्ष वगळता अन्य राजकीय पक्षांचे अस्तित्व आहे काय? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादीत विलीन केला आहे काय? असा प्रश्न पडतो. मनसे कडून राष्ट्रवादी सोबत आपण आघाडी केली आहे, असे जाहीर केले जात आहे. मात्र मनसेचा एकमेव उमेदवार देखील राष्ट्रवादीच्या घड्याळ या निवडणूक चिन्हावर निवडणुकीला सामोरे जात आहे. त्यामुळे पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते प्रचारापासून दूर आहेत. राष्ट्रीय पक्ष म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा कर्जत पालिका निवडणुकीत एकही उमेदवार नाही. काँग्रेसला राष्ट्रवादीने आपल्या सोबत घेतले नसताना देखील निवडणूक लढविण्यासाठी दाखल केलेले चारही अर्ज मागे घेतले असल्यानं काँग्रेसचा प्रवास कोणत्या दिशेने सुरु आहे याचे उत्तर सामान्य काँग्रेस कार्यकर्ता मागत आहे.

शेतकरी कामगार पक्ष हा राष्ट्रवादी सोबत रायगड जिल्हा परिषदेत एका घरात राहत आहे. मात्र शेकापला राष्ट्रवादीने एकही जागा सोडली नसल्याने शेकाप दोन जागांवर आपली ताकद अजमावत आहे. या राजकीय घडामोडीमुळे शेकाप आणि राष्ट्रवादीमध्ये निर्माण झालेले वितुष्ट हे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दरार निर्माण करणारे आहे. भारिप बहुजन महासंघ कर्जत शहरात प्रभाग नऊ मध्ये आपली ताकद लावून रणांगणात उतरला आहे. या सर्व रणधुमाळीत राष्ट्रीय काँग्रेस हा पक्ष कर्जत शहरात नामशेष तर होणार नाही ना? हा प्रश्न उपस्थित होत आहे.